लातुर : मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही, असं म्हणत अनेकदा भाजपने ठाकरेंवर टीका केली. तोच धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. ‘मुंबई पलिकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहीत नाही’, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ते लातुरमध्ये बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र असं वाटतं. मुंबई पलिकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहीतच नाही. अडीच वर्षांच्या काळात ते केवळ एकदाच ते पाहणी दौऱ्यावर सोलापूरला गेले होते. तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं. त्याच्या पलीकडे ते गेले नाहीत. कुणाच्याही बांधावर जाण्याचे कष्ट त्यांनी घेतले नाही”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औसा तालुक्यात रस्त्यांचं लोकार्पण करण्यात आलं.आमदार अभिमन्यू पवार यांनी पुढाकार घेत शेतरस्त्याचा प्रश्न मांडला अन् त्या चळवळीला यश आलं. 1 हजार 300 किलोमीटर शेत रस्त्यांचं उद्घाटन आणि लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच 2 हजार 500 एकर फळबागांसह 1 हजार पशु गोठ्यांचे लोकार्पणही केलं गेलं. यामुळे ग्रामिण भागातील रस्ते अधिक सुखकर होणार आहेत. शेतात जाण्याचे रस्ते दुरूस्त झाल्येन शेतीची कामे जलद गतीने होण्यास मदत होईल.