औरंगाबाद | 7 ऑगस्ट 2023 : एकेकाळी शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या. खांद्याला खांदा लावून प्रत्येक मोर्चात आणि आंदोलनात जे आघाडीवर होते. ते दोन शिवसैनिकच आज एकमेकांविरोधात भिडलेले दिसले. निमित्त होतं औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीचं. या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. निधी वाटपावरून या दोन्ही शिवसैनिकांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे डीपीडीसीची बैठक वादळी ठरली.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री संदीपान भुमरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. कन्नडचे ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी या बैठकीत निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या मतदारसंघात एक पैसाही मिळाला नसल्याचं राजपूत म्हणाले. त्यावर जिल्हाधिकारी त्याबाबत तुम्हाला पत्र देऊन खुलासा करतील, असं पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितलं. पण भुमरे यांचं उत्तर उडवाउडवीचं वाटल्याने अंबादास दानवे यांनी या उत्तराला आक्षेप घेतला.
विरोधी पक्षाच्या आमदारांना तुम्ही निधीच देत नाही. केवळ विरोधी पक्षाचे आमदार आहेत म्हणून निधी नाकारला जातो. तुमच्याकडून पक्षपातीपणा होतोय, असा आरोप दानवे यांनी केला. त्याला भुमरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. बैठकीचं वातावरण तापलं. संतप्त झालेले दानवे उभे राहून बोलू लागले. तावातावाने दानवे बोलत होते. तर भुमरे बसूनच दानवे यांच्या प्रत्येक विधानाचा समाचार घेत होते. पालमंत्री आहात म्हणजे ही तुमची जहांगिर नाहीये, असं दानवे यांनी भुमरे यांना सुनावलं. तर, होय, आज आमचीच जहांगिरी आहे, असं म्हणत भुमरे यांनी पलटवार केला. त्यावर हे कशाचं सरकार आहे? कसलं सरकार आहे? असा संताप दानवे यांनी व्यक्त केला.
ही वादावादी सुरू असतानाच भुमरे यांच्या बाजूलाच बसलेले अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार हे भुमरे यांची बाजू उचलून धरत होते. हा सर्व गोंधळ वाढल्याने आमदार उदयसिंह राजपूतही आक्रमक झाले. राजपूत यांनी आमदारांना निधी मिळत नसल्याचा आरोप करत कागदपत्रे भिरकावली. निधीची मागणी करणारा हा प्रस्ताव होता.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे गटाच्या आमदाराने डीपीडीसीच्या बैठकीत मुद्दा मांडायचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं. सत्तेत नसताना निधी मिळावा, विकास व्हावा हे सर्वांना वाटतं. सत्तेत असलेल्या आमदारांना निधी नेहमीच जास्त मिळतो हा अलखित नियम आहे. यापूर्वी तुम्हाला निधी मिळत होता. त्यात काही कमतरता होती का? मग कशाला पाहिजे तुम्हाला वाढीव निधी? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला.
पालकमंत्री सहकार्य करत होते. पण आक्रमक भूमिका घेऊन अंगावर जाणं योग्य नाही. कन्नडच्या आमदारांनी सांगितलं एक रुपया निधी आला नाही. पालकमंत्र्यांनी सांगितलं कलेक्टरकडून लेखी उत्तर मिळेल. तरीही त्यांनी गोंधळ घातला. कुणी गोंधळ घालत असाल तर पालकमंत्री उत्तर देतील. तुम्ही असं वर्तन कराल तर पालकमंत्री उत्तर देणारच.
बोलणं आणि धावून जाणं यात फरक आहे. धावून जाण्याची त्यांची हिंमत नाहीये. ते बोलले. त्याला पालकमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. निधी मिळणार नाही असं कसं होईल? आरोप खोटा आहे की नाही हे मला माहीत नाही. कलेक्टरच त्यावर बोलतील, असंही शिरसाट यांनी सांगितलं.