ओडिशा – ओडिशाच्या (Odisha)आदिवासी महिला द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu)यांची राष्ट्रपतीपदी (President)निवड झाली आहे. मूळच्या ओडिशाच्या असलेल्या द्रौपदी मुर्मु यांचा परिचय झारखंडच्या माजी राज्यपाल असा असला तरी त्यांनी अत्यंत साधे आयुष्य जगलेले आहे. जीवनात अनेक दु:खांचा सामना करत, त्यावर मनोबलाने मात करीत द्रौपदी मुर्मु या आज देशाच्या राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मुर्मु यांच्या ओडिशातील पहाडपूर गावातही सध्या उत्साहाचे वातावरण आहे. या गावाच्या प्रवेशाच्या ठिकाणी एक पुतळा स्थापन करण्यात आला आहे. हा पुतळा आहे द्रौपदी मुर्मु यांच्या पतींचा, १ऑक्टोबर २०१४ रोजी त्यांचे पती श्यामचरण मूर्मू यांचे निधन झाले. श्याम चरण यांचे वय त्यावेळी ५५ वर्ष होते.
गावात प्रवेश केल्यानंतर अडीच किलोमीटर अंतरावर एक शाळा आहे. याळेचे नाव आहे श्याम, लक्ष्मण, शिपुन उच्च प्राथमिक निवासी विद्यालय. कधी काळी या ठिकाणी एक घर होते. याच घरात ४२ वर्षांपूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नववधू म्हणून प्रवेश केला होता. विवाहोत्तर काळात २०१० ते २०१४ या चार वर्षांत त्यांना तीन संकटांचा सामना कारावा लागला. याच चार वर्षांत त्यांच्या दोन तरुण मुलांचा आणि पतीचा मृत्यू झाला. मोठा मुलगा लक्ष्मण याचा मृत्यू २०१० साली गूढरित्या झाला. आजही त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडलेले नाही. तो त्याच्या मित्रांकडे पार्टी करण्यासाठी गेला होता. रात्री घरी परतला. सांगितलं की मी थकलो आहे, मला डिस्टर्ब करु नका. सकाळी दरवाजा लाजवला तर उघडला गेला नाही. दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर २५ वर्षीय मुलाचा मृतदेहच सापडला. हे दुख पचवत नाहीच तोच दुसरा मुलगा शिुपन २०१३ साली रस्त्यावरील गाडीच्या अपघातात मारला गेला. त्याचे वय तेव्हा २८ होते. दोन मुलांच्या आणि पतीच्या मृत्यूनंतर या घराची जागा द्रौपदी मुर्मु यांनी निवासी वसतीगृहाला देऊन टाकली.
या तीन मृत्यूंसोबतच आणखी एक शल्य त्यांच्या मनात होते. त्यांच्या पहिल्या मुलीचा मृत्यू वयाच्या तिसऱ्या वर्षीच १९८४ साली झाला होता. त्यानंतर २०१० साली पहिल्या मुलाच्या मृत्यूनंतर द्रौपदी मुर्मु या सहा महिने डिप्रेशनमध्ये होत्या. त्यावेळी त्यांना ध्यान आणि आध्यात्माने मदत केली. यातून त्यांनी पुढच्या आयुष्यातील संकटांवर मात केली, असे सांगण्यात येते.
द्रौपदी मुर्मू या पहाटे साडे तीन वाजता उठून ध्यान, योगा आणि सकाळचे चालणे करतात, अशी माहिती त्यांच्या गावातील नीकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांची वेळ पाळण्याबाबत आणि वेळेवर येण्याबाबतही ख्याती असल्याचे सांगण्यात येते. अत्यंत जमिनीवरील नेत्या अशीच त्यांची परिसरात ओळख आहे. त्यांच्या राज्यपालपदाच्या काळात झारखंडच्या राजभवनाचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले होते, असेही सांगण्यात येते. २०१७ साली राज्यपाल असताना भाजपाच्याच सरकारचे एक विधेयक त्यांनी माघारी पाठवले होते. आदिवासींचे हित महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी विधेयकाच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित केले होते.