नवी दिल्ली: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राणा दाम्पत्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यावरही नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. हनुमान चालिसासाठी आम्हाला आत टाकलं. महिलांना तुरुंगात टाकणारं हे सरकार आहे. माझ्यावर जो अन्याय केला. हनुमान चालिसापासून ते तुरुंगापर्यंत मला त्रास दिला गेला. आजही त्रास होत आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार नाहीत. ज्या दिवशी तुमची सत्ता जाईल आणि रश्मी ठाकरेंना (rashmi thackeray) तुरुंगात टाकलं तर त्या दिवशी त्यांना विचारेन आता कसं वाटतंय. वेदना काय असते. तुरुंग काय असतो आणि तुरुंगातील एक एक मिनिट किती वेदनादायी असतो, हे मी मुख्यमंत्र्यांना विचारेल. काही ही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्यावर त्याची वेदना काय असते हे तेव्हाच तुम्हाला कळेल. हा दिवस एक दिवस येणारचय तुमची सत्ता गेल्यावर तुमच्या घरातील महिला तुरुंगात गेल्यावर तुम्हाला मी हा सवाल करणारच, असा संताप नवनीत राणा यांनी व्यक्त केला.
नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. एका महिलेला कारण नसताना तुरुंगात टाकलं जातं. तिला काय वेदना होत असतील याची कल्पना तरी तुम्हाला आहे का? आम्ही घाबरून तिकडे जात आहे असं तुम्ही म्हणता. आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत. आम्ही तुमच्या कोणत्याही जाळ्यात फसणारे लोक नाहीत, असं नवनीत राणा म्हणाल्या.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवण्याची मागणी केली होती. त्यांचं हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. तुम्ही म्हणता हनुमान चालिसा म्हणायचा असेल तर काश्मीरमध्ये जा. हनुमान चालिसा वाचण्यासाठी मी जम्मू काश्मीरमध्ये जाऊ शकते तर महाराष्ट्रात पठण का करू शकत नाही? महाराष्ट्रावर संकट आलं आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणत होते. महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू आहे. बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ही संकट दूर करण्यासाठीच आम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं होतं. जेव्हा महाराष्ट्रावर संकट येतं तेव्हाच संकटमोचकाची आठवण केली जाते, असंही त्यांनी सांगितलं.
अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुलं अर्पण करणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अशा लोकांना जमिनीत गाडले असते. मात्र, महाराष्ट्राला इतका लाचार मंत्री मिळाला हे दुर्देव आहे. मातोश्री आज दहा जनपथच्या विचारधारेवर चालत आहे. त्यांच्यासाठी दहा जनपथ हीच मातोश्री झाली आहे. आजची शिवसेना ही शिवसेना नसून ती औरंजेब सेना झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.