नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्ताने केंद्राच्या गृह विभागाने पोलीस दलातील उत्कृष्ट तपासासाठीची पदके जाहीर केली आहेत. यात छोट्या छोट्या राज्यांनाही बक्षीसं मिळाळी आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आला आहे. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. पण यंदा तपासाच्या श्रेणीत मुंबई पोलिसांसह राज्य पोलिसांना एकही पदक मिळालेलं नाहीये. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच राज्यातील पोलिसांची कामगिरी खालावली आहे की काय? असा सवालही केला जात आहे. तसेच राज्याच्या गृहखात्याचं हे मोठं अपयश असल्याचंही सांगितलं जात आहे.
उत्कृष्ट तपासात महाराष्ट्राला एकही पदक मिळालेलं नाही. गृहमंत्रालयाने 2023 साठी उत्कृष्ट तपास केलेल्या अधिकाऱ्यांना पदके घोषित केली आहेत. त्यात यंदा मुंबई पोलिसांसह राज्य पोलिसांना उत्कृष्ट तपासासाठी एकही पदक मिळालेले नाही. देशभरातून 140 अधिकाऱ्यांची या पदकांसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेने लहान राज्यांना पुरस्कार मिळाले मात्र महाराष्ट्राला यंदा पदक मिळालेलं नाहीये.
यंदा सर्वाधिक 15 पदके सीबीआयला आणि 12 पदके राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाली आहेत . त्यानंतर उत्तर प्रदेश (10 ) आणि केरळ ( 9 )चा क्रमांक येतो. राज्यनिहाय पदके – आंध्र प्रदेश 5 , आसाम 4 , बिहार 4 , छत्तीसगढ 3. गुजरात 6 , हरयाणा 3 , झारखंड 2 , कर्नाटक 5 , मध्य प्रदेश 7. ओडिशा 4 , पंजाब 2 , राजस्थान 9 , मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्किम, त्रिपुरा, उत्तराखंड, चंडीगडला प्रत्येकी 1 , तामिळनाडू 8, तेलंगणा 5 , पश्चिम बंगाल 8 , नवी दिल्ली 4 , अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, लडाख, लक्षद्वीप, पुद्दुचेरीला प्रत्येकी एक पदक मिळालं आहे.
दरम्यान, यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. शौर्य पदकाच्या बाबतीत केंद्रीय गृहमंत्र्यांचा महाराष्ट्रद्वेष दिसला. महाराष्ट्रातील पोलीस दलाचा गृहखात्याने अपमान केलाय. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यावर टीका केल आहे. राज्यातून एकालाही पदकं देण्यात आलं नाही. मला वाटतं यावर कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोललं पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कर्तबगार समजतात त्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. त्यांनी आधी बोलावं. मग आम्ही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करू, असं संजय राऊत म्हणाले.
प्रत्येकवेळी केंद्राकडून महाराष्ट्राचा अपमान होत आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे. हे विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे आहेत. राज्यावर अन्याय करणारे आहेत. त्यावर सत्ताधाऱ्यांनी तोंड उघडायला हवे. आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला आवडत नाही. पण आम्ही बोलू. प्रत्येकवेळी महाराष्ट्राला डावललं जात आहे. सतत राज्याचा अपमान करण्याचं हे धोरण केंद्राने स्वीकारलं आहे, अशी टीका त्यांनी केली.