एक इमानदार पोलीस अधिकारी, भ्रष्टाचाराचा आरोप अन् ऐन तारुण्यात जगाला अलविदा, कोण आहे ‘ही’ लेडी सिंघम?

| Updated on: May 19, 2023 | 6:08 PM

दबंग, डॅशिंग आणि धाडसी पोलीस अधिकारीचा डोळ्यात पाणी आणणारी कहानी, आरोपीसोबत एक वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये नंतर त्यालाच घातल्या बेड्या पण शेवट अत्यंत वाईट.

एक इमानदार पोलीस अधिकारी, भ्रष्टाचाराचा आरोप अन् ऐन तारुण्यात जगाला अलविदा, कोण आहे ही लेडी सिंघम?
Follow us on

मुंबई : एखाद्यावर वाईट वेळ अशी येते की कोणी स्वप्नातही विचार केलेला नसतो. अशीच वेळ एका लेडी सिंघमवर आली आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी पोलीस सब इन्स्पेक्टर जूनमोनी राभाने जगाचा निरोप घेतला आहे. मंगळवारी सकाळी नागांव जिल्ह्यात तिचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला.

जूनमोनी राभाच्या कारची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातानंतर जूनमोनीला रूग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला आहे. पण तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न आणि संशय व्यक्त केला जात आहे. कारण जूनमोनी ही मोठी दबंग, डॅशिंग आणि धाडसी पोलीस अधिकारी होती. तसंच आता जूनमोनीचा अपघात पाहता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

कोण होती जूनमोनी राभा?

1 जुलै 1993 साली आसामच्या कामरूप जिल्ह्यात पोलीस सब इन्स्पेक्टर जूनमोनी राभाचा जन्म झाला होता. तिच्या वडिलांचं नाव कमल राभा होतं. पण त्यांचं आधीच निधन झालं होत. जूनमोनीला लहाणपणापासूनच पोलीस दलात जाण्याची इच्छा होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिनं पोलीस भरतीसाठी तयारी केली. त्यानंतर तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं आणि तिची 1 जुलै 2017 मध्ये आसाम पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली. त्यानंतर तिनं अनेक ठिकाणी काम केलं. पण 13 डिसेंबर 2021 रोजी तिची नागांव पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली. तेव्हापासून ती तिथेच काम करत होती.

होणाऱ्या नवऱ्यालाच तिने घातलेल्या बेड्या

पोलीस सब इन्स्पेक्टर जूनमोनी राभा काही वादांच्या प्रकरणात देखील अडकली होती. ती तिच्या कामामुळे आणि कामाच्या पद्धतीमुळे लेडीज सिंघम म्हणून ओळखली जाऊ लागली होती. त्यावेळी ती चांगली चर्चेत आली होती. लोकांमध्ये तिचा एक वेगळाच दरारा होता. जूनमोनीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाच अटक केली होती. तिने मागील वर्षी 8 मे रोजी फसवणूक केल्याप्रकरणी तिचा होणारा नवरा राणा पोगागला अटक केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार जून मोनी आरोपी राणा सोबत एक वर्षांहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये होती त्यानंतर तिने त्याच्यासोबत साखरपुडा देखील केला होता. राणा पोगागने जूनमोनीला ONGC चा अधिकारी असल्याचं खोटं सांगितलं होतं. तसंच त्यानं ONGC मध्ये नोकरीचे लावण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांना लाखोंचा गंडा घातला होता. तसंच जूनमोनी आणि राणा नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार होते. पण त्याआधीच जूनमोनीला राणा लोकांना फसवत असल्याचं समजलं.

जूनमोनीलाही जावं लागलं होतं तुरूंगात

जूनमोनी राभा मजुली येथे काम करत होती त्यावेळी दोन कंत्राटदारांनी तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती की, तिनं तिचा प्रियकर राणा सोबत मिळून आर्थिक व्यवहार केले होते. तसंच आपली फसवणूक झाल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर आसाम पोलिसांनी जूनमोनीची चौकशी केली आणि तिला 5 जून 2022 रोजी अटक केली होती. त्यानंतर जूनमोनीला आसाममधील माजुली जिल्ह्य़ातील न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसंच तिला सेवेतून निलंबित देखील करण्यात आले होते. पण नंतर तिचं निलंबन मागे घेण्यात आलं आणि ती पुन्हा सेवेवर रूजू झाली.

दरम्यान, जानेवारी 2022 मध्ये जूनमोनी आणखी एका वादात अडकली होती. तिचे बिहपुरिया मतदारसंघातील भाजप आमदार अमिया कुमार भुईयांसोबतचे फोनवरील संभाषण लिक झालं होतं.