उत्तर प्रदेश । 6 ऑगस्ट 2023 : कुबेराचा खजिना कधीच संपत नाही अशी एक म्हण आहे. ही म्हण खरी ठरवणारी एक व्यक्ती आहे. उत्तर प्रदेशमध्ये या माफियाची इतकी दहशत होती की त्याचे नाव घेण्यास बडे बडे पोलीस अधिकारीही कचरत असत. याच कुख्यात माफियाने इतकी संपत्ती जमविली की त्यापुढे कुबेरचा खजिनाही कमी पडावा. कुबेराच्या खजिन्यापेक्षाही जास्त खजिना त्याने दडवून ठेवला आहे. जो संपण्याचे नावच घेत नाही. त्याने लपवलेली संपत्ती आता एकामागोमाग एक बाहेर येत आहे.
उत्तर प्रदेशातील हा माफिया आहे अतिक अहमद. अतिक अहमद याचा १५ एप्रिल २०२३ ला मृत्यू झाला. त्याआधीही तो अनेक वर्षे तुरुंगात होता. आता त्याच्या मृत्युनंतर त्याचा लपलेला खजिना समोर येत आहे. चकिया येथे अत्यंत गरिबीचे दिवस जगणाऱ्या अतिक अहमद याने गुन्हेगारीचा मार्ग धरला. काही काळातच तो उत्तर प्रदेशातील मोठा माफिया बनला.
अतिक अहमद याची इतकी दहशत होती की त्याचे नाव घेतले तरी इतर गुन्हेगार चळाचळा कापत. राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यामुळे त्याला कोणताही धोका नव्हता. त्यामुळेच अवैध मार्गाने कमविलेला पैसा तो वर्षानुवर्षे दडपून ठेवत होता.
अतिकच्या डोक्यावर राजकीय बॉसचा हात असल्याने त्याची चौकशी करण्याचे कोणालाही धाडस होत नव्हते. परंतु, उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आले आणि त्याचे दिवस पालटले. अतिकला अटक झाली. त्याला तुरुंगवास झाला आणि शोध सुरु झाला त्याने जमविलेल्या काळ्या संपत्तीचा.
उत्तर प्रदेश पोलिसांनी आत्तापर्यंत अतिक अहमदची सुमारे साडेतीन अब्ज रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली आहे. या सर्व मालमत्ता झुंसी, चकिया, लखनौ, कासारी-मासारी, झालवा, कौशांबी आणि सिव्हिल लाईन्स येथे खरेदी केल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अनेक भागात अजूनही त्याची मालमत्ता असून या संदर्भात अतिकचे वकील आणि त्याच्या नातेवाईकांची सतत चौकशी केली जात आहे. अतिकची पत्नी शाइस्ता परवीन अनेक महिन्यांपासून फरार आहे. शाईस्ताच्या अटकेनंतरही आणखी संपत्ती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अतिकची आणखी 12 कोटी रुपयांची एक मालमत्ता जप्त केली आहे. अतीक अहमदचे वकील विजय मिश्रा यांना अटक केल्यानंतर या बेनामी संपत्तीची बातमी मिळाली. अशी आणखी किती बेनामी मालमत्ता आहेत याची माहिती मिळविण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.
अतिक अहमद या माफियाच्या या सर्व बेनामी मालमत्ता गँगस्टर कायद्यांतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मालमत्ता त्याने काळ्या पैशाने विकत घेतल्या गेल्या होत्या त्यामुळे त्या परत मिळविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, असेही पोलिसांनी सांगितले.
अतिक अहमद याच्याकडे या मालमत्तेव्यतिरिक्त बरेच सोने आणि चांदीचे दागिनेही होते. 2017 मध्ये त्याने सुमारे 1750 ग्रॅम सोने आणि साडेतीन किलो चांदी असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांना दिली होती. या सोन्या चांदीची किंमतच आता कोटींच्या घरात आहे. याशिवाय अतिकची पत्नी शाइस्ता, त्यांची मुले, भाऊ अशरफ, भावाची पत्नी जैनब आणि इतर नातेवाईकांच्या नावावरही अनेक मालमत्ता खरेदी करण्यात आल्या आहेत.