ठाणे | 29 ऑगस्ट 2023 : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत एक विधान केलं अन् राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मी मुख्यमंत्री झालो तर पोलिसांना मी भगव्या टोप्या देईल, असं सतोष बांगर म्हणाले. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री झालो तर पोलिसांना भगव्या देऊ, असं म्हटल्याची आठवण संतोष बांगर यांनी करून दिली आहे. यावर आता माजी मंत्री, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष बांगर यांचं वक्तव्य ऐकून मला अतिशय आनंद होतोय, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ते ठाण्यात माध्यमांशी बोलत होते.
बांगर यांचं म्हणणं ऐकून मला अतिशय आनंद होतोय. माणसाने स्वप्न पहावीत ना. माणसाने महत्वकांक्षी असावं. महाराष्ट्राची आजची परिस्थिती बघता संतोष बांगर यांचं हे स्वप्न सत्यात उतरणं शक्य आहे. त्यामुळे संतोष बांगर स्वप्न बघत असेल तर वाईट काय? महाराष्ट्रातील बदललेल्या संस्कृतीत संतोष बांगर यांचं महत्त्वाचं स्थान आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
आमच्यातील एक वंजारी स्वप्न बघत आहे. त्या स्वप्न सत्यात उतरतंय की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र स्वप्न तर बघतोय. खांद्यावर बसून सिल्वेस्टर स्टेलोनसारखी बॉडी दाखवत आहे. असा मुख्यमंत्री मला आवडेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.
संतोष बांगर माझ्या भावासारखा मित्र आहे. त्याच्या मनातील इच्छा काय आहेत. हे सर्वात जास्त मला माहित आहेत. त्याच्या सर्व काही गोष्टी मला माहित आहेत. अमेरिकनमधील सिल्वेस्टर स्टेलोन, माइक टायसन देखील सध्या घाबरलेला आहे. हा कोण मोठा आमच्यापेक्षा जास्त बायसेप शोल्डर असणारा कोण खेळाडू आहे?, असा प्रश्न त्यांना पडला आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. गंजी फ्रॉकमध्ये लोकांमध्ये यायला हिंमत लागते. ती हिंमत संतोष बांगरमध्ये आहे, असंही ते म्हणालेत.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे काही दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. त्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी भगिनी अॅक्टिव्ह होत असेल तर तिला माझ्याकडून शुभेच्छा! पंकजा मुंडे यांचं समाजामध्ये वजन आहे. तिच्या वडिलांची पुण्याई आहे. पंकजा यांचं मी नेहमीच स्वागत करत आलो आहे. आताही मी शुभेच्छा देतो, असं आव्हाड म्हणाले.