पालघर : वसई विरारमध्ये पावसाने थोडी विश्रांती घेतली. पण, वसईच्या अंबाडी रोड परिसरातील 15 च्या वर सोसायटी या पाण्याखालीच आहेत. सोसायटी परिसरात फूटभर पाणी, घरात फूटभर पाणी आहे. त्या पाण्यात संपूर्ण दुर्गंधी असल्याने नागरिक अक्षरशा नरक यातना भोगत आहेत. मागच्या पाच दिवसांपासून या परिसरातील रहिवाशांचे हाल सुरू आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी यांच्याकडे बघीतलेसुद्धा नसल्याने रहिवाशांचे हाल सुरू आहेत. वसई पश्चिम अंबाडी रोडच्या बाजूला सी कॉलनी, एच कॉलनी, लाभ कॉम्प्लेक्स, गोकुल आंगण, दिवाण मेन्शन, विशालनगर या मोठ्या कॉम्पेलक्समध्ये सर्वत्र पाणी साचले आहे.
या प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये 5 ते 10 अंतर्गत इमारती आहेत. कॉम्प्लेक्सच्या परिसरात तळमजल्यावर सर्वत्र दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. जवळपास 300 ते 400 कुटुंबांच्या घरात पाणी आलं आहे. हे रहिवासी कुणी टेरेसवर, कुणी शेजारील घरात तर कुणी हॉटेलमध्ये राहत आहेत. रहिवाशांचे हाल बेहाल झाले आहेत.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात येथील सोसायट्याचे हाल असेच होतात. येथील पाणी साचल्यास एक आठवड्यानंतर पाणी ओसरायला लागते. सध्या ड्रेनेजच पाणी सोसायटीच्या पाणी पिण्याच्या टाकीत गेले आहेत. आता ही टाकी साफ केल्यानंतरच याच पाणी पिण्यायोग्य होईल. बेकायदेशीर माती भराव, मोठ्या प्रमाणात झालेले बांधकाम, नैसर्गिक नाले बुजवले यामुळे पाणी साचून राहत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा पालिका प्रशासन काढावा अशी मागणी स्थानिक रहिवासी मिलिंद चव्हाण, सुशांत धुलप यांनी केली आहे.
वसईच्या अंबाडी रोड येथील सी कॉलनी लोटस बिल्डिंगमध्ये राहणारे प्रकाश पेवेकर यांच्या घरात tv9 ची टिम पोहचली. या घरात 63 वर्षाचे प्रकाश पेवेकर सारखे तळमजल्यावरील 300 ते 400 कुटुंबाच्या घरात पाणी साचलेलं आहे. घरातील सामानाचे अतोनात नुकसान झाले आहे. फ्रिज, वॉशिंग मशीन, खाद्य सामान, बेडचे सामान, यांनी घरातच वर ठेवले आहे. पेवेकर स्वतः कुटुंबासमवेत सोसायटीतील एका रिकाम्या रुममध्ये राहत आहेत. याच्यासारखेच काही सदस्यांनी तर हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेऊन राहत आहेत.
काहीजण टेरेसवर राहत आहेत. तेथेच जेवण बनवून, झोपत आहेत. पाणी ओसरण्याची वाट आता हे कुटुंब बघत आहे. आणखीन दोन दिवस तरी घरातील पाणी ओसरणार नसल्याचं नागरिकांनी सांगितलं. घरात घाणीच साम्राज्य ही निर्माण झाल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले आहेत. पाणी ओसरल्यावर आता आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.