संतोष नलावडे, सातारा : सातारा जिल्ह्यामधील (Satara Crime News) वाई तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे. न्यायालयाच्या परिसरातच अटकेत असलेल्या आरोपींवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Satara Firing News) वाई न्यायालय परिसरामध्ये कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (Aniket Narayan Jadhav), निखील आणि अभिजीत शिवाजी मोरे (Abhijeet Shivaji More) यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यावर न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.
वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे अटकेत आहेत. खंडणी आणि दरोडा घातल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी कळंबा कारागृहातून अटक केली होती. त्यानंतर आरोपींना दोन दिवसांची न्यायालीयन कोठडी सुनावण्यात आली होती.
या आरोपींना वाई न्यायालयाच्या परिसरात दोघांना नेत असताना अज्ञातांनी गोळीबार केला. दोन फायर झाल्या मात्र कोणालाही काही दुखापत झाली नाही. पोलीस आरोपींना नेत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने पोलिसांचा काही धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, गोळीबार होताच सर्वत्र धावपळ उडालेली घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांनी न्यायालयाच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी गोळीबार केलेल्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समजत आहे.