जालना : नियम व कायदे सर्वांसाठी समान असतात. मग, तो सर्वसामान्य माणूस असो किंवा एखादा VIP. सर्वांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी वाहतूक नियम बनवण्यात आले आहेत. पण अनेकदा या वाहतूक नियमांची पायामल्ली होते. वाहतूक नियम मोडले जातात, तेव्हा वाहतूक पोलिसाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. सर्वसामान्यांकडून वाहतूक नियम पाळण्याची अपेक्षा केली जाते. रस्त्यावर सर्वसामान्य जेव्हा वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात, तेव्हा वाहतूक पोलीस कारवाई करतात. बऱ्याचदा या कारवाईच स्वरुप दंडात्मक असतं.
खरंतर लोकप्रितिनिधींकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. त्यांनी इतरांसमोर उदहारण ठेवायच असतं. पण काहीवेळा लोकप्रतिनिधींना याचा विसर पडतो. अशीच एक घटना महाराष्ट्रात घडली.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
छत्रपती संभाजी नगरमध्ये एका केंद्रीय मंत्र्याने वाहतूक नियमाच उल्लंघन केलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे बिनाधास्त, मोकळेपणासाठी ओळखले जातात. कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याचा त्यांचा स्वभाव आहे. हेच रावसाहेब दानवे छत्रपती संभाजी नगरमध्ये आले होते.
नंबर प्लेटवर बॉस लिहिलेल
त्यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून वाहतूक नियमांची मोडतोड झाली. विना हेल्मेट आणि फॅन्सी नंबर प्लेटच्या बुलेटवर त्यांनी रपेट मारली. रावसाहेब दानवे यांनी स्वतःच्याच बुलेटवरून फिरताना वाहतूक नियमांचे उल्लंघन केलं. बुलेटच्या नंबर प्लेटवर बॉस लिहिलेल होतं. बॉस लिहिलेल्या बुलेटवरून त्यांनी विना हेल्मेट रपेट मारली.
मग कार्यकर्ते काय आदर्श घेणार?
महत्त्वाच म्हणजे ते बुलेटवरून रपेट मारताना मंत्रिपदाचा ताफासोबत होता. रावसाहेब दानवे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. नेतेच स्वत: नियमांची मोडतोड करणार, मग कार्यकर्ते काय आदर्श घेणार? असा सवाल विचारला जातोय.