बारामती | 25 ऑगस्ट 2023 : राज्यातील कांदा प्रश्न अधिकच चिघळला आहे. शेतकऱ्यांनी राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद पाडले आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारने दोन लाख टन कांदा खरेदी करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याला 2410 रुपये भाव देण्याची घोषणाही केली आहे. त्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार हे कृषी मंत्री असताना त्यांनी असा निर्णय घेतला नव्हता, तो केंद्र सरकारने घेतला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. शिंदे यांचं हे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना चांगलंच लागलेलं दिसतं. शरद पवार यांनी या विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारलं आहे.
मी कृषी मंत्री असताना असा निर्णय झाला नव्हता हे खरे आहे. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं बरोबर आहे. कारण मी कृषीमंत्री असताना 40 टक्के ड्युटी कधी लावली नव्हती, असं फटकारतानाच कांदा प्रश्न उद्भवला कशावरून? तुम्ही 40 टक्के ड्युटी रद्द करा, प्रश्न संपेल. त्यामुळे मुख्यमंत्री जे म्हणत आहेत त्यांना काही माहिती नाही. ते अर्धवट माहिती देत आहेत. त्यांनी 40 टक्के ड्युटी रद्द होण्याचा प्रयत्न करावा. तो होत असेल तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी मान्य करेन, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते बारामतीत मीडियाशी संवाद साधत होते.
कांदा खरेदी करताना 2410 चा रेट देत असल्याचं केंद्राने सांगितलं आहे. पण प्रत्यक्षात मार्केटमध्ये 1600 आणि 1700 रुपये असा भाव सुरू आहे. त्यामुळे केंद्राने सांगितलेल्या भावालाही विक्री होत नाही. म्हणून या सर्वांचा फेरविचार केला पाहिजे. काल मी केंद्रीय मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण माझा काही संपर्क होऊ शकला नाही. आज पुन्हा मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे, असं शऱद पवार यांनी स्पष्ट केलं.
यावेळी शरद पवार यांनी साखर निर्यातीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. साखरेच्या निर्यातीवर बंधन आणावीत अशी चर्चा केंद्राच्या त्या खात्याच्या मंत्रालयात सुरू आहे. त्यांनी काही लोकांशी चर्चाही केली असल्याची माहिती आहे. आम्हाला त्यातून प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की, साखरेवर सुद्धा निर्यातीवर बंधनं येतील. ती बंधनं आली तर बाजारभाव खाली येतील, असं पवार म्हणाले.