पुणे : केंद्र सरकारमध्ये ऊसाचा, साखरेचा किंवा कुठलाही प्रश्न उभा राहिला तर मदतीसाठी नेहमी पुढे येणारे एकच मंत्री आहेत, ते म्हणजे नितीन गडकरी (Nitin Gadkari), असे कौतुक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नितीन गडकरी यांचे केले आहे. ते पुण्यात बोलत होते. मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथील राज्यस्तरीय साखर परिषदेत त्यांनी गडकरींचे कौतुक केले आहे. गेल्या वर्षापर्यंत या देशात साखरेचे उत्पादन (Sugar production) घेणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश होते. मात्र यावर्षी महाराष्ट्र साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आला आहे. गाळपाचा अतिरिक्त भार कारखान्यांवर वाढला आहे. ऊसाचे उत्पादन आणखी वाढणार आहे. पावसाची परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता असल्याने ऊसाचे उत्पादन वाढणार असल्याची शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले.
ऊसतोडीचे नियोजन आताच करावे लागेल. साखरेची निर्यात चांगली झाली आहे. यावर्षी सारखेचे उत्पादन विक्रमी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार 90 लाख टनापेक्षा जास्त साखरेची निर्यात झाली आहे. या हंगामात 64 लाख टन साखर निर्यातीसाठी करार झालेत, अशी माहिती त्यांनी दिली. भारताने यावर्षी जगातील 121 देशात साखरेची निर्यात केली, हे पहिल्यांदा झाले, असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
आज आपल्या शेतकऱ्यांकडे दोन पैसे मिळतील, असे खात्रीशीर पीक नाही.अपेक्षित ऊस उत्पादन यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. ऊस विकास योजना सातत्याने राबविली जात नाही. त्यामुळे त्याचा परिणाम ऊस उत्पादनावावर होत आहे. ऊस विकास योजना राबवली तर उत्पादनात भरीव वाढ होणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, विजेची मागणी वाढत आहे. मात्र कोळश्याची निर्मिती कमी झाली आहे. विजेची मागणी वाढली आहे. 6 हजार मेगावॅट विजेची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे बाहेरून विजेची खरेदी करावी लागत आहे.