पुणे : राज्यसभा निवडणूक (Rajya Election) भाजपाने लादली आहे. भाजपाने माघार घेऊन सकारात्मक पाऊल टाकायला पाहिजे होते, असे वक्तव्य मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय साखर परिषद आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी तसेच राज्यसभा निवडणूक याविषयी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने झाले. या परिषदेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती आहे. सतेज पाटील यांनी परिषदेपूर्वी टीव्ही 9सोबत बातचित करताना राज्यसभा निवडणूक तसेच राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले.
सतेज पाटील म्हणाले, की महाविकास आघाडीकडे नंबर्स आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार राज्यसभा निवडणुकीत निवडून येणार आहेत. कोल्हापुरातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार हे 100 टक्के निवडून येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजपावर टीका करताना ते म्हणाले, की भाजपाने ही निवडणूक लादली आहे. त्यांनी माघार घेऊन एक सकारात्मक पाऊल टाकायला हवे होते. मात्र तसे झाले नाही, अशी टीका त्यांनी केली. इम्रान प्रतापगढी राष्ट्रीय पातळीवर काम करणारे नेते आहेत. भाजपाच्या विखारी प्रचाराला काँग्रेस प्रबळपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीत कुरबुरी असून काँग्रेस नाराज असल्याची चर्चा सातत्याने ऐकायला मिळते. यावर ते म्हणाले, की काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नाही. भाजपाला रोखण्यासाठी तीन पक्ष एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीचा काँग्रेस एक भाग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी येणाऱ्या निवडणुकीत यश संपादन करेल. या सरकारला कुठलाही धोका नाही. किंबहुना भाजपाची मते बाजूला जातील. भाजपाने आपले आमदार सांभाळले पाहिजेत.