निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 13 ऑगस्ट 2023 : इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी दोन दिवस ही बैठक पार पडणार आहे. ठाकरे गटाने या बैठकीचं यजमानपद स्वीकारलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर 31 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना रात्र भोजनाचा कार्यक्रमही ठेवला आहे. पाटणा आणि बंगळुरूत ही बैठक यशस्वी पार पडल्याने आता मुंबईतील या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी येणार आहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे संकेत आहेत. मात्र, राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना राहुल गांधी मातोश्रीवर जाणार आहेत काय? असा सवाल करण्यात आला. त्यावर पटोले यांनी स्पष्टच सांगून टाकलं. राहुल गांधी हे मातोश्रीवर जाण्याचा असा काही कार्यक्रम ठरलेला नाही, असं नाना पटोले म्हणाले. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्याने राहुल गांधी हे मातोश्रीवर जाण्याच्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.
आम्ही 48 लोकसभा प्रभारी नेमले आहेत. 16 ऑगस्टला बैठक आहे, नंतर विधानासभेची बैठक होईल. जागा वाटपाला बसू तेव्हा आम्ही भूमिका मांडू. महाराष्ट्रतून भाजप कसा नष्ट होईल हीच आमची भूमिका आहे. आम्ही पदयात्रा करतोय. सहा भागात पदयात्रा असेल. या पदयात्रेतून सरकारने कसा चुकीचा कारभार सुरू आहे हे दाखवून देऊ. सरकार आपल्या दारी कार्यक्रम झाला. त्याचा खर्च कुठून केला? ही लूट आहे. सरकार आपल्या दारी कार्यक्रमातून भाजप लूट करत आहे, असं नाना पटोले म्हणाले. आम्ही 3 सप्टेंबरपासून आमची पदयात्रा सुरू करू. गणेशोत्सव आणि नवरात्र संपल्यावर पुन्हा यात्रा सुरू होईल. नंतर बसने यात्रा सुरू करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात पुन्हा एकदा वज्रमूठ सभा होणार आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. एवढ्यात वज्रमूठ सभेचा काही निर्णय झालेला नाही. इंडिया आघाडीची बैठक झाल्यावर नंतर बघू, असं त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरही त्यांनी भाष्य केलं. जो पक्ष भाजपच्या विरोधात लढायला उभा राहील त्याला सोबत घेणार असल्याचं आम्ही आधीच जाहीर केलं आहे. शरद पवार आमच्यासोबत आहेत. शरद पवार यांनीच तसं जाहीर केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
केंद्र सरकारने आयपीसी कायद्यात अनेक बदल केले आहेत. काही कायद्यात दुरुस्त्या केल्या आहेत. काही नवे कायदे निर्माण केले आहेत. तर काही जुने कायदे रद्द केले आहेत. देशद्रोहाचा कायदाही रद्द करण्यात आला आहे. त्यावरही पटोले यांनी सवाल केले. आताच देशद्रोहाचा कायदा रद्द का करण्यात आला? आताच कायदा रद्द करण्याचं कारण काय? कुरुलकर हे संघाशी संबंधित आहेत. त्यांना वाचवण्यासाठी हे विधेयक आणले का? असा सवाल पटोले यांनी केला आहे.
महात्मा गांधी यांच्या बद्दल बोलणाऱ्या व्यक्तीला काहीच केले जात नाही. पण नरेंद्र मोदींविरोधात बोलल्यावर अजामीनपात्र गुन्हा ठरवला जातो. संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णीला अभय दिलं जात आहे. सत्तेत बसलेले लोक सत्तेचा गैरवापर करत आहेत. लोकांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. तसेच भिडेंविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
अजितदादांना दुसऱ्यांना प्रमाणपत्र देण्याची मानसिकता राहिलेली नाही. अजितदादांची अगोदरची भाषण बघा. तिकडे गेल्यावर त्यांची भाषा बदलली. लाल गाडीच्या दिव्यात बसल्यावर भाषा बदलली आहे. पहिले पन्नास खोके होते, आता 100 खोके झाले आहेत, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.