पुणे : मुंबई-पुणे (Mumbai-Pune) अंतर लवकरच कमी होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ वाचणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्त्यासाठी तयार करण्यात येण्यात असलेल्या बोगद्यांचे काम वेगाने सुरु आहे. जानेवारी २०२५ पर्यंत हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामधील एक बोगदा 1.75 किलोमीटर लांब तर दुसरा 8.93 किलोमीटरचा आहे. हे दोन्ही बोगदे लांबीच्या द्दष्टिने देशात सर्वाधिक मोठे आहेत. हा प्रकल्प सुरु झाल्यावर वाहतूक सुरळीत होणार आहे.
का निर्माण केले बोगदे
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहापदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. तसेच भागामध्ये घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यत बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले आहे.
आठ पदरी नवा रस्ता
या प्रकल्पामुळे बोर घाटातील सहा किलोमीटर वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. लोणावळ्यापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्झिट इथे संपणार आहे. प्रकल्पातंर्गत दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम सुरू आहे. पुण्याकडून मुंबईला जाताना असणारा बोगदा सुमारे 9 किलोमीटर लांबीचा असणार आहे. यातील साडेसहा किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे.
कधी पूर्ण होणार
पुणे-मुंबई एक्स्प्रेस मार्गावरील हे बोगदे सुरु होण्याची वेळी सतत पुढे ढकलण्यात आली आहे. मार्च २०२४ मध्ये हे सुरु करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हे डेडलाईन हुकली. आता जानेवारी २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार आहे. लोणावळा लेकखालून हे दोन्ही बोगदे जात आहेत. हे बोगदे पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतूनही सुटका मिळणार आहे.