पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाची (assembly by election)निवडणूक बिनविरोध करावी असा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधात निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. आता भाजपमध्ये उमदेवारीसंदर्भात सस्पेंश कायम आहे. या परिस्थितीत टिळक परिवाराची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. मुक्ता टिळक (mukta tilak)यांच्या निधनामुळे या मतदार संघात २७ फेब्रवारी रोजी निवडणूक होत आहे. यामुळे भाजप टिळक परिवाराला उमेदवारी देणार का? चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरुड मतदार संघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देणार? हा निर्णय अजून झालेला नाही. या दरम्यान मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची प्रतिक्रिया आली आहे.
शैलेश टिळक म्हणाले की, टिळक परिवारात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. मुक्ता टिळक यांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केले आहे. मुक्ता टिळकांचं मतदार संघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा आहे. पण कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील, असेही म्हणाले आहेत.
तुम्ही निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर बोलताना शैलेश टिळक म्हणाले की, जर पक्षाने संधी दिली तर मी ही निवडणूक लढवण्यास तयार आहे. मी अनेक वर्ष मुक्तांसोबत काम केलेल आहे. माझा मुलगाकुणाल देखील चांगलं काम करत आहे. त्यामुळे परिवारात उमेदवारी मिळावी, अशी आमची इच्छा असली तरी पक्षाचा निर्णय आम्हाला बांधील राहिल.
रुपाली ठोंबरे इच्छूक :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रूपाली पाटील-ठोंबरे हे इच्छुक आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा बोलून दाखवली. पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा कसबा मतदार संघाची निवडणूक लढवण्यास तयार आहे. पण येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतली. त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करू. कसबातील मतदार विकास करणाऱ्या, सुखसुविधा पुरवणाऱ्या व्यक्तीकडे बघूनच मतदान करतात. पूर्वीपासून काँग्रेस लढवत होते म्हणून तेच लढवतील किंवा भाजप दरवेळी निवडून येतात. म्हणून यंदाही तेच निवडून येतील असं आता होणार नाही. परंतु कसबा निवडणूक बिनविरोध होणार नाही.तस मी वरिष्ठांना निवेदन दिले असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचा दावा :
भाजपची तयारी सुरु असताना महाविकास आघाडीतून काँग्रेसने कसबा मतदार संघासाठी दावा केला आहे. दोन वेळा काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्याचा दाखला दिला जात आहे. काँग्रेसकडून माजी नगरसेवक अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, कमल व्यवहारे यांची नावे पुढे आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही या मतदार संघावर दावा केला जात आहे.