पुणे | 11 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात आपण सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक एकदम जवळचे मित्र होताना आपण पाहतोय. गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. कधी एकेकाळी एकमेकांचे अतिशय जवळचे मित्र असणारे नेते एकमेकांचे विरोधक बनले आहेत. तर वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून संबोधले जाणारे पक्ष आणि त्या पक्षाचे नेते एकमेकांचे पक्के दोस्त बनले आहेत. त्यांच्यात आता घनिष्ठ मैत्रीचे संबंध निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळालं आहे. विशेष म्हणजे फक्त राजकारणातच नाही तर आता मनोरंजन क्षेत्रातही अशा घडामोडी बघायला मिळताना दिसत आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली डान्सर गौतमी पाटील ही तिच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे अनेकांना डोकेदुखी ठरली होती. तिच्या आक्षेपार्ह डान्स स्टेप्सच्या मुद्द्यावरुन तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. तसेच तिच्या कार्यक्रमांमुळे इतर कलाकारांना मिळणाऱ्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या बंद झाल्याची जोरदार चर्चा होती. या चर्चांदरम्यान अभिनेत्री माधुरी पवार हिने गौतमी पाटील हिच्यावर सडकून टीका केली होती.
माधुरी पवार हिच्याकडून सातत्याने गौतमीवर निशाणा साधला जात होता. त्यामुळे दोन्ही कलाकारांमध्ये छत्तीसचा आकडा निर्माण झालेला बघायला मिळत होता. पण आता या दोन्ही कलाकारांचं मनोमिलन झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही कलाकारांची आता मैत्री झालीय. त्यामुळे गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. पुण्यात नुकतंच पार पडलेल्या एका कार्यक्रमात दोघींनी एकमेकींना फ्रेंडशिप बॅन्ड बांधलं आहे.
पुण्यातील कार्यक्रमात दोघींचा वाद मिटवून एकत्र आणण्यासाठी अभिनेता सुभाष यादव याने प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. माधुरी पवार हिने वारंवार गौतमी पाटील हिच्यावर टीका केली होती. पण आता दोघीजणी आपला वाद विसरून एकत्र आल्या आहेत. दोघींच्या मनोमिलनामुळे सांस्कृतिक क्षेत्रात विविध चर्चा रंगवल्या जात आहेत.
विशेष म्हणजे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या साक्षीने दोन्ही कलाकारांमध्ये मैत्री झालीय. तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या महिलांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कासाठी नेहमी लढत असतात. त्यांनी काही दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिची बाजू घेतली होती. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील हिच्यावर टीका केल्यानंतर तृप्ती देसाई मैदानात आल्या होत्या. महिला आपल्या पुढे गेलेल्या बघवत नाही म्हणून इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील हिच्यावर टीका केली, अशा शब्दांत तृप्ती देसाई यांनी सुनावलं होतं.