पुणे : यंदाचा गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) हा निर्बधमुक्त साजरा झालाय… विसर्जन मिरवणूक देखील निर्बंध मुक्त असेल. मात्र मिरवणूक लवकरात लवकर संपावी यासाठी मंडळांनी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी केले आहे. विसर्जन मिरवणुकीत पाच हजारांपेक्षा जास्त अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त असणार आहे. 3 हजारांपेक्षा जास्त गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता मिरवणूक सुरू होणार आहे. उद्या सकाळपर्यंत मिरवणूक संपेल, अशी आशा अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली आहे. लोकांच्या सेवा सुविधांचा विचार करून सगळी व्यवस्था केली आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, सर्वच मंडळे विसर्जन (Immersion) मिरवणुकीस सज्ज झाले आहेत. थोड्याच वेळात मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.
मिरवणुकीत सहभागी होणारी मंडळे त्याचप्रमाणे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यांची काळजी घेतली आहे. वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. काही ठिकाणी रस्ते बंद तर रिंग रोड तयार करण्यात आला आहे. सकाळी सातपासून हे सगळे रस्ते काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी वळवण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत, अशी माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली आहे. ध्वनी प्रदुषण, मारामारी, पाकिटमारी, महिलांची छेड तसेच समाज विधातक कृत्ये घडू नयेत, याचे नियोजन केल्याचे गुप्ता म्हणाले.
विसर्जन मिरवणुकीसाठी गणेश मंडळांचीदेखील लगबग सुरू झाली आहे. मानाच्या पाच गणपतींची आरती झाल्यानंतर थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर मंडईपासून अलका चौकापर्यंत राष्ट्रीय कला अकादमीच्या कलाकारांकडून रांगोळीच्या पायघड्या घातल्या जात आहेत. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणुकीस सज्ज झाला आहे. शंखनाद पथकाकडून शंखनाद झाल्यानंतर हा गणपती निघणार आहे. अखिल मंडई गणपतीच्या दर्शनासाठी अजित पवार याठिकाणी आले. त्यांनी आरतीही केली.