अभिजित पोते, पुणे | 7 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी सोमवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत झालेली बैठक, शरद पवार यांच्या गटातून जयंत पाटील अजित पवार यांच्या गटात येणार का? या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. पुण्यात साखर संकुलात झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, हे अजित पवार यांनी सांगितले. या बैठकीला राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील साखर कारखान्यांबाबत अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आढावा घेतला. सहकार क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
राज्याचा विकास करण्यासाठी मी भाजपसोबत आलो आहे. सध्या देशाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये मोदी यांच्याशिवाय दुसरा कोणताच नेता मला दिसत नाही, असे अजित पवार यांनी सांगितले. अमित शाह यांच्यासोबत महायुतीसंदर्भात रविवारी झालेल्या बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात अजून काही बैठका होणार आहेत. परंतु आमची जास्त चर्चा राज्याच्या विकासावर झाली. राज्यातील इथेनॉल संदर्भात जे प्रस्ताव असतील ते पाठवा, असे अमित शाह यांनी सांगितले.
तसेच पुण्यात विविध प्रकल्पांवर चर्चा झाली. पुणे मेट्रो, वाघोली रोड, चांदणी चौक यासारखे अनेक प्रकल्प राबण्यासाठी दूरगामी योजना करण्याची सूचना अमित शाह यांनी केली.
जयंत पाटील रविवारी शरद पवार यांच्यासोबत होते. शनिवारी ते शरद पवार यांच्यासोबत होते. ते जर अमित शाह यांना भेटले असते तर त्यांनी स्पष्ट सांगितले असते. उगीच काही बातम्या दिल्या जात आहेत. मी स्पष्टच सांगत आहे की, जयंत पाटील अमित शाह यांना भेटले नाही. मी देखील भाजपसोबत आल्यानंतर अमित शाह यांना भेटलो, असे अजित पवार यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात दोन्ही आमदारावर कुठला ही दबाव नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यांना हव्या त्या गटात ते जातील, असे ते म्हणाले.