पुणे : शेतीमालाला बाजारभाव नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला असतानाच शिरूर (Shirur) तालुक्यातील मांडवगण फराटा येथील फुलकोबी (फ्लॉवर) उत्पादक शेतकऱ्याच्या (Farmer) हाती अवघ्या साडे नऊ रुपयांची पट्टी आली आहे. यावर संबंधित शेतकऱ्याने स्वतःच्या खात्याचा साडे नऊ रुपयांचा चेक बाजार समितीमधील व्यापाऱ्याला दिला आहे. यामुळे शेती करायची कशी, असाही प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात तरकारी उत्पादक शेतकरी (Vegetable farmers) मोठ्या प्रमाणावर आहेत शेतात तरकारी पिकवून यावरच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होत असतो. या भागात मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी आदी पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. सर्व खर्च वजा जाता केवळ साडे नऊ रुपये आल्याने शेतकऱ्याची मोठी निराशा झाली आहे.
ही तरकारी पिके कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत पुणे, मुंबई, सुरत आदी ठिकाणी रोजच्या रोज पाठवली जातात. याठिकाणी लिलाव पद्धतीने शेतकऱ्याच्या मालाची खरेदी केली जाते. मात्र अतिरिक्त खर्चाचा बोजा, वाहतूक भाडे हे शेतकऱ्याच्याच माथी मारले जात आहे.
मांडवगण फराटा येथील शेतकरी किसन फराटे यांनी मोठ्या आशेने फ्लॉवरची लागवड केली. खते आणि औषधे देत पीकदेखील जोमदार आले होते. तोडणी केल्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथे विक्रीसाठी फ्लॉवर पाठवले होते. यावेळी सर्व खर्च वजा जाता हाती अवघी 9 रुपये 50 पैसे इतकी पट्टी लागली. यामुळे फराटे यांची मोठी निराशा झाली आहे.
फ्लॉवरला चांगला बाजारभाव मिळेल म्हणून त्यांनी या पिकाची लागवड केली होती. मात्र ही आशा फोल ठरली असून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. संपूर्ण पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. तसेच संबंधित व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. शेतमालात फसवणूक होत राहिली तर भविष्यात शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी हताश प्रतिक्रिया त्यांनी दिली.