रत्नागिरी | 29 जुलै 2023 : राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर एक गट राज्यातील शिंदे सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील या गटाने शरद पवार यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्नही केला. या गटाने दोनवेळा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना भाजपच्या नेतृत्वातील एनडीएत येण्याची विनंतीही केली. पण शरद पवार यांनी त्याला ठाम नकार दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे आता हे दोन्ही गट एकत्र येणार की नाही? अशी चर्चा रंगली आहे. शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने दोन्ही गट एकत्र येणार नसल्याचीही चर्चा आहे. मात्र, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी सूचक विधान करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? असा सवाल सुनील तटकरे यांना करण्यात आला. त्यावर, राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र येतात का हे पाहण्यासाठी काही कालावधी पुरतं आपण थांबावं. काळाच्या ओघात याची उत्तरे नक्की मिळतील, असं सूचक विधान खासदार सुनील तटकरे यांनी केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
उद्धव ठाकरे गटाचा आज हिंदी भाषिकांचा मेळावा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांचा हिंदी भाषिकांचा मेळावा तो त्यांचा अधिकार आहे, असं ते म्हणाले. महायुतीमध्ये आम्ही समन्वय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी भाजप आणि शिंदे शिवसेना यांचे एकूण 12 सदस्य या समितीत आहेत. महायुतीच्या एकत्र सभांचा कार्यक्रम लवकरच राज्यात होईल, असं तटकरे यांनी सांगितलं.
विरोधी पक्षाचे खासदार मणिपूरमध्ये जाणार आहेत. त्यावरून त्यांनी विरोधकांवर टीका केली. मणिपूरमध्ये विरोधी खासदारांना जाण्याचा अधिकार नाही. मणिपूरमधला विषय हा खूप संवेदनशील आहे. लोकसभेमध्ये त्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आलेला आहे, असंही ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार याबाबत इंडिया आघाडीमध्ये नाराजी का आहे याबाबत मला माहिती नाही. शरद पवार अशा अनेक कार्यक्रमाला जात असतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे पालन पवार साहेबांच्याकडून नेहमीच होत असतं. इंडिया आघाडीमध्ये या कार्यक्रमाला जाण्यावरून नाराजी असेल तर हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीमध्ये अजितदादांनी सरकार चालवण्याचं मोठं योगदान दिलेलं आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक कदाचित मुंबईत होत असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात प्रकल्प यावेत हे क्रमप्राप्त आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पामध्ये स्थानिकांना विश्वासात घ्यावं. स्थानिकांच्या मनातल्या शंका त्यांनी दूर केल्या पाहिजेत. त्यानंतर बारसू रिफायनरी प्रकल्प करण्यास काही हरकत नसावी. स्थानिकांनी सरकार काय बाजू मांडते हे समजून घ्यावं. सरकारची बाजू ग्रामस्थांना पटली तर प्रकल्पाचा मार्ग सुकर होऊ शकतो, असंही ते म्हणाले.
या देशाचे राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधी यांची ओळख आहे. मात्र नको ती विधाने करून संभाजी भिडे तेढ निर्माण करत आहेत. संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने ताबडतोब कारवाई केली पाहिजे. कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे. महात्मा गांधींबद्दल असे शब्द वापरणं हे अयोग्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे, असंही ते म्हणाले.