सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपण राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या निवृत्तीच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीसह मित्र पक्षातील अनेक नेत्यांसाठी हा निर्णय धक्कादायक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही राज्याच्या राजकारणाच्या महत्वाच्या निर्णयामध्येही शरद पवार केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनेक नेत्यांना धक्का बसला आहे.
त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटातही अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे त्यांच्या या निवृत्तीनंतर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले की, त्यांचे नेतृत्व राज्याला आणि देशाला दिशादर्शक आहे.
त्यामुळे आताच त्यांनी निवृ्त्तीची घोषणा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह ठाकरे गटातही अस्वस्थता पसरली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाचा फायदा राज्याबरोबरच देशालाही आझाला आहे.
खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले की, शरद पवार हे केवळ महाराष्ट्राचे नेते नाहीत तर देशाचे नेतृत्व करणारे नेते आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत प्रकृतीची त्रासदायक कारणे असूनसुद्धा कुठेही मागे न हटता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले आहे.
त्यामुळे यशस्वी नेतृत्व करणारे नेते म्हणूनही त्यांचं नाव लौकिक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. शरद पवार यांनी एवढ्या लवकर त्यांनी निवृत्तीची घोषणा करणं हे योग्य होईल असं मला वाटत नाही असं सांगत आमच्यासारख्यांना शरद पवार यांच नेतृत्व हवं हवसं असल्याचेही त्यांनी भावूकपणे सांगितले.
शरद पवार यांच्या आरोग्याच्या समस्या असताना त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांच्यामुळे राज्यात वेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळाली असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.