Vasai Selfie : वसईत पिता-पुत्राचा सेल्फीने जीव घेतला, तो क्षण टिपायला गेले, पण तो अखेरचाच ठरला

| Updated on: Aug 28, 2023 | 7:26 PM

पालघर जिल्ह्यातील वसईत सेल्फीमुळे पिता पुत्राला जीव गमवण्याची वेळ आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकं काय घडलं ते वाचा

Vasai Selfie : वसईत पिता-पुत्राचा सेल्फीने जीव घेतला, तो क्षण टिपायला गेले, पण तो अखेरचाच ठरला
Vasai Selfie : वसईत पिता-पुत्रांना सेल्फीनं ढकललं मृत्यूच्या जबड्यात, एका क्षणात असं घडलं की..
Follow us on

वसई, पालघर : मोबाईल सेल्फीमुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्याचं आपण आतापर्यंत वाचलं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात घडली आहे. शैलेश मोरे आणि त्यांचा मुलगा देवेंद्र समुद्रकिनारी निर्माल्य टाकण्यासाठी गेले होते. मात्र तेथून ते घरी परतलेच नाहीत. त्यांना त्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह झाला. हा मोह त्यांच्या जीवावर बेतल्याची दु:खद घटना घडली. 45 वर्षीय शैलेश गजानन मोरे आणि त्यांचा मुलाग देवेंद्र शैलेश मोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे वसई पश्चिम दिवानमान येथे राहणारे आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

रविवारी सकाळी शैलेश आणि त्यांचा मुलगा देवेंद्र निर्माल्य टाकण्यासाठी मोटरसायकलवरून वसई किल्लाबंदर जेट्टीवर गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी सेल्फी घेण्यासाठी खटाटोप सुरु केला. त्यात त्यांचा तोल समुद्रात गेला आणि ते बुडाले असल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. पण ते कोण होते याबाबतची माहिती त्यांना नव्हती. या घटनेची माहिती किल्लाबंदर येथील सामाजिक कार्यकर्ते व्हॅलेंटाईन मिरची आणि त्यांच्या ‘वसई युवा बळ’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसई पोलिसांना दिली.

पोलिसांनी मोटरसायकलच्या नंबर प्लेटवरून शोध घेतला असता शैलेश मोरे असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर स्थानिक मच्छिमार, पोलीस आणि अग्निशमनदलाच्या जवानांनी त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अजूनही मृतदेह आढळून आलेले नाहीत.

सेल्फी काढताना काळजी घ्या

अनेकदा समुद्रकिनारी, धबधब्यावर किंवा उंचावर असताना सेल्फी काढण्याचा मोह होतो. अशा ठिकाणी काळजी घेणं खूपच महत्वाचं आहे. कारण एक चूक चांगलीच महागात पडू शकते. अनेक घटनांमध्ये जीव गमवण्याची वेळही आली आहे.