मुंबई : देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक दिन 6 जून 2022 रोजी साजरा होत आहे. या दिवशी सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत राहणारी शिवज्योत (Shivajyot) प्रज्वलित केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर अखंड तेवत राहणारी ही देशातील पहिलीच शिवज्योत असणार आहे. विशेष म्हणजे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology) वापर करण्यात येत असून जगभरात अशी ज्योत स्थापन करणारे तज्ञ यासाठी काम करत आहेत. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरून शिवज्योत सांगली येथे आणण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ कायमस्वरूपी ज्योत तेवत ठेवली जाणार आहे. या शिवज्योत स्थापनेसाठी स्वराज्यातील सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, पन्हाळगड, रायगड या पाच किल्यावरची माती तर कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या नद्यांचं पाणी आणण्यात आलं आहे. आज या शिवज्योतीचा पायाभरणी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 5 पाच किल्यावरची माती आणि 5 नद्या चे पाणी पायाभरणी करताना पाया भरणीत सोडण्यात आले.
आपल्या इतिहासातूनच आपल्याला प्रेरणा मिळते. सांगली शहरातील तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व ध्येयवाद कायम तेवत राहावा. यासाठी या ज्योतीची स्थापना करण्यात येत आहे अशी भावना या उपक्रमाचे संकल्पक विरेंद्र पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. शिवछत्रपतींचे स्मरण व नमन करण्यासाठी सर्वांनी 6 जूनला संध्याकाळी 6 वाजता या ज्योत प्रज्वलनाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहनही पृथ्वीराज पाटील यांनी केले.