पालघर | 28 जुलै 2023 : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, चंद्रपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. अनेक नद्यांना पूर आलाय. नदीतील पाण्याला जास्त प्रवाह आला आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात वाहून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. आतापर्यंत अनेकांचा यामुळे मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पण तरीही नागरिक या घटनांपासून बोध घेताना दिसत नाहीत. नागरीक पाण्याच्या प्रवाहात उतरण्याचं धाडस करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. वसईच्या तुंगारेश्वर जंगलात असात काहीसा प्रकार घडला. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वसईच्या तुंगारेश्वर जंगलातील नदीत फॉर्च्यूनर कार वाहून जाताना वाचली आहे. फॉर्च्यूनर कारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. वसईच्या तुंगारेश्वर महादेवाच्या मंदिरात आणि वॉटर फॉलकडे जाण्यासाठी प्रथम हीच नदी पारकडून 2 किलोमीटर पुढे जावे लागते.
नदीला पाण्याचा प्रवाह जास्त असताना फॉर्च्यूनर कार पाण्यातून नेण्यात आली. त्यामुळे ही कार पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होती. पण नशिब बलवत्तर असल्याने बाजूला नदीच्या बंदराची भिंत असल्याने कार वाचली आहे. मिळालेल्या माहिती नुसार ही घटना काल गुरुवार सायंकाळी 5 वाजताची आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारचे नुकसान झालं आहे.
वसई पश्चिम गोकुळ अंगण परिसर हा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. या परिसरातील 9 इमारती गुडगाभर पाण्याखाली आहे. त्यामुळे 200 कुटुंबांची मागच्या 15 दिवसांपासून वाताहत सुरू आहे. इमारतीचा तळ मजल्यात मागच्या 15 दिवसांपासून पाणी शिरले आहे. आजूबाजूचा सोसायटीचा परिसर हा जलमय झालाय.
या सोसायटीमधील रहिवाशी हे वरच्या मजल्यावरील एकमेकांना आधार देऊन राहत आहेत. इमारतीच्या मीटर बॉक्स खाली पाणी, वीज चालू आहे. कधीही विजेचं करंट घरांमध्ये शकतं. अनेकांच्या घरात जेष्ठ नागरिक, महिला आहेत, लहान मूल आहेत, ते सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन इमारतीत राहत आहेत.
गोकुळ अंगण सोसायटीच्या तळ मजल्याच्या सर्व घरात पाणी गेल्याने घरात फूट दोन फूट पाणी साचले आहे. घरातील सर्व सामान भिजले आहे. घरातील रहिवाशी सोसायटीच्या टेरेसवर किंवा इतर शेजाऱ्यांच्या घरात राहत आहेत. सर्व सोसायटी पाण्याखाली गेल्याने नागरिक हैराण असतानाही वसई विरार महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी फिरकले सुद्धा नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्या राहिवाशांच्या घरातील इलेक्ट्रिक वस्तू, फर्निचर सर्व खराब झाले आहेत.