सांगली : सांगली-सोलापूर हे दोन जिल्हे जवळ आहेत. सोलापुरात पंढरपूर ही वारकऱ्यांची पंढरी आहे. या पंढरपुरात आषाढी एकादशीला वारकरी मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे एसच्या विशेष फेऱ्या आयोजित केल्या जातात. सांगली येथून जादा बसेस पाठवण्यात आल्या. याचा सांगली बस डेपोला मोठा फायदा झाला.
आषाढी एकादशीदरम्यान सांगली जिल्ह्यातील एसटीच्या दहा आगारांतून ३४८ बसच्या १ हजार ४१८ फेऱ्या झाल्या. १ लाख ७२ हजार २४९ किलोमीटर बस धावल्या. ६४ लाख ५ हजार ६६२ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी ६१ लाख १४ हजार ७४ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. गतवर्षीपेक्षा २ लाख ९१ हजार ५८८ रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले.
वारकऱ्यांच्या रूपाने एसटीला विठुराया पावला आहे. आषाढी एकादशीसाठी केलेल्या नियोजनातून सांगली विभागाला ६४ लाखावर उत्पन्न मिळाले आहे. ७९ हजार ८३८ वारकऱ्यांची सुखरूप आणि सुरक्षित वारी घडवून आणण्यात सांगली विभागाला यश आले.
२५ जून ते ४ जुलैपर्यंत केलेल्या नियोजनातून जिल्ह्यातील सांगली, शिराळा, इस्लामपूर, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, विटा, पलूस, तासगाव आगारांतून गाड्या धावल्या. वारकऱ्यांच्या माउलीप्रती असलेल्या ओढीतून सांगली विभागाच्या तिजोरीत ६४ लाखावर रुपये जमा झाले. त्यामुळे विठ्ठल पावला असे म्हणावे लागणार आहे. हे उत्पन्न जरी मोठे दिसत असेल तरी ते ना नफा, ना तोटा असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.
एसटी नेहमी तोट्यात असल्याचे सांगितले जाते. पण, आषाढी एकादशी निमित्त का होईना. एसटी बसला प्रवासी मिळाले. त्यामुळे प्रवाशांची असुविधा टाळली गेली. जुने लोकं अजूनही एसटीने जातात. आधुनिक काळात कार किंवा बाईक असल्याने वाहनांची संख्या वाढली आहे.