जळगाव : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट काँग्रेससोबत मिळवणी करण्याचं विधान केलं आहे. आम्ही काँग्रेस सोबत युती करायला तयार आहोत, असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मात्र, त्याचबरोबर गुलाबराव पाटील यांनी एक अटही घातली आहे. आता ही अट काँग्रेस मान्य करणार काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. आम्ही काँग्रेस सोबत युती करण्यास तयार, असं धक्कादायक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हे पूर्ण आयुष्य काँग्रेसच्या विरोधात संघर्ष केला. त्या काँग्रेसवाल्यांनी आमचे पठ्ठे फोडले. त्यांच्याबरोबर आम्ही बिलकुल जाणार नाही. राहुल गांधी यांनी भगवा झेंडा हातात घ्यावा. त्यांनी जर भगवा झेंडा हातात घेतला तर आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरेंना आम्ही यापूर्वी सावध केलं होतं की पुढे रेड झोन आहे. गाडी फेल होईल. जाऊ नका. आपण आता इथेच गाडी थांबवली पाहिजे. रस्ता चुकीचा दिसतोय. मात्र गाडीतले संजय राऊतसारखे काही चुकीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर भेटले. त्यामुळे गाडीचा अपघात झाला. गाडी दिशाहीन झाली. शिवसेनाप्रमुखांनी जी शिवसेना उभी केली ती भगव्या करता केलेली आहे हिंदुत्व करता केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही कधी बसू शकतो, हे कधीच होणार नाही, असं पाटील म्हणाले.
नेत्यावर प्रेम असणारा कार्यकर्ता नेत्यांचे बॅनर लावतो. यापूर्वीही कार्यकर्त्यांनी माझे बॅनर लावले होते. मला राज्यमंत्रीपद मिळावं म्हणून जळगावात बॅनर्स लावण्यात आले होते. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचेही बॅनर्स लागले असतील. कार्यकर्त्यांच्या भावनतेून त्याकडे पाहिले पाहिजे, असं ते म्हणाले.