जळगाव | 19 ऑगस्ट 2023 : तब्बल 40 तासानंतर जळगावच्या ईश्वरलाल ज्वेलर्स म्हमजे आरएल ग्रुपवरील ईडीची कारवाई संपली आहे. ईडीने गुरुवारी ईश्वरलाल ज्वेलर्सवर छापेमारी केली होती. विशेष म्हणजे या छापेमारीची अख्खा दिवस कुणालाच गंधवार्ता नव्हती. दुसऱ्या दिवशी या छापेमारीची माहिती आली. त्यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली. काल रात्री ईडीचे अधिकारी ज्वेलर्स शॉपमधून निघून गेले. जळगावाच्या इतिहासातील ईडीची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.
17 ऑगस्टला ईडीने सकाळीच एकाच वेळी नाशिक, ठाणे, जळगाव या ठिकाणी आर.एल. ग्रुपवर छापेमारी केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ईश्वरलाल ज्वेलर्सवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. आरएल ग्रुपच्या ज्वेलर्सच्या बाहेर जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कुणालाही आत येण्यास आणि आतील लोकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. पोलिसांनाही या छापेमारीची गंधवार्ता नव्हती. तब्बल 40 तासाहून अधिक वेळेपर्यंत ही कारवाई सुरू होती. या झाडाझडतीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आर. एल. समूहाकडून दागिने, रोकड, तसेच महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे जप्त केल्यानंतर ईडीचे अधिकारी काल अडीच वाजता रात्री निघून गेले.
दरम्यान, या छापेमारीचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. ईश्वरलाल जैन हे शरद पवार यांचे अत्यंत जवळचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जता आहे. ईश्वरलाल जैन यांनीही मी गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचं समर्थन करत आलो आहे. पवार साहेबांवर माझा विश्वास असून यापुढेही त्यांचे समर्थन करत राहील. ईडीच्या छापेमारीने मी विचलीत होणार नाही, असं म्हटलं आहे.
दरम्यान आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईत ईडीच्या पथकाकडून तब्बल 87 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कोट्यवधीचे सोने तसेच कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत. यात तब्बल 50 किलो सोने असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलीस बंदोबस्तात पथकाने सर्व सील केलेला मुद्देमाल एका लोखंडी पेटीत ठेवण्यात आला. त्यानंतर हा मुद्देमाल घेऊन पथक रवाना झाले.
जळगावातील स्थानिक स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत हा सर्व मुद्देमाल ठेवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. छापेमारीवेळी राजमल लकीचंद ज्वेलर्स समूहाचे मालक राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन आणि त्यांचे चिरंजीव, माजी विधान परिषद आमदार मनीष जैन हे सुद्धा उपस्थित होते.