अमरावती : राज्यात नवं सरकार येऊन आता सहा महिन्याच्यावर अधिक काळ लोटला आहे. मात्र, तरीही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे अनेक आमदार मंत्रिपदासाठी वेटिंगवर आहेत. यातील काही आमदार तर ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते. आपल्या मंत्रीपदावर लाथ मारून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पण आता सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे हे आमदार अस्वस्थ झाले आहेत. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे त्यापैकीच एक आहेत. बच्चू कडू यांना अजूनही मंत्रीपद मिळालं नाही. मंत्रिपद मिळालं नसलं तरी आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रीपदावरच दावा केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते हौ, तो हम मुख्यमंत्री बनना चाहते है, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली आहे. प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. हा अमरावतीचा पक्ष आहे. दिल्ली, मुंबईचा पक्ष नाही. लोक आम्हाला म्हणते गद्दारी का केली? असं विचारतात. पण आम्ही काही गद्दारी केली नाही. आमचा पक्ष आहे. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचंय तर आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं.या
पूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला असून आपली इच्छा मुख्यमंत्री बनण्याची आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर, दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याचीही चर्चा रंगली आहे. याशिवाय या विस्तारात बच्चू कडू यांना संधी मिळणार की नाही? याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी विविध विषयांवर मीडियाशी संवाद साधला होता. संत्र्यांचं ब्रँडिंग करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिलं आहे. संत्र्यांचं ब्रँडिंग झालं तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्यांना संत्री फेकून द्यावी लागणार नाहीत, असं बच्चू कडू म्हणाले होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना टोले लगावले. सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या. त्या चांगली भाषणं देतात. त्यामुळे आम्हालाही कधी कधी वाटतं शिवसेनेत चाललं जाव. पण सुषमा अंधारे यांचा अचलपूरचा अभ्यास थोडा कमीच आहे, असा टोला त्यांनी लगावला.
सुषमा अंधारे यांच्या भाषणात नव्वद टक्के प्रॉब्लेम आहे. आम्ही प्रहार आहे. प्रहार वार करते. हम फसते नही. देवेंद्रजी आम्हाला मदतच करतात. सुषमा ताई म्हणतात, आम्हाला शिवसेनेने मदत केली. तर मग त्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली का…? माझ्या प्रचाराला उद्धव ठाकरे आले होते का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.