चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या बातम्या आपण चंद्रपुरातून नेहमी वाचतो. पण, बहुधा या घटना जंगलात घडतात. काल याहून वेगळी अशी घटना घडली. वाघाच्या एका जोडीनं वर्दळीच्या ठिकाणी प्रवेश केला. त्यामुळं चांगलीच खळबळ उडाली. शहरालगतच्या वीज केंद्र ते ताडोबा मार्गाला जोडणाऱ्या भागात वाघाची जोडी दिसली. काल रात्री या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना वाघ (Tiger) जोडीचे दर्शन झाले. पावसाळा ऐन भरात असताना अशा पद्धतीने वर्दळीच्या रस्त्यावर वाघाच्या जोडीचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. याच भागातून आसपासची गावे व कोळसा खाणीच्या (Coal Mine) प्रकल्पांकडे जाण्याचा मार्ग आहे. वर्दळीच्या या मार्गावर वाघ जोडीच्या दर्शनाने वनविभाग सतर्क झालाय. वाघ जोडीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभाग (Forest Department) सरसावला आहे.
वीज केंद्र ते ताडोबाला जाण्याच्या मार्गावर ही वाघाची जोडी दिसली. रात्री प्रवास करणाऱ्यांना या वाघाच्या जोडीचे दर्शन झाले. त्यांनी रात्रीच्या अंधारात या वाघांचे व्हिडीओ काढले. कारजवळच ही वाघाची जोडी होती. त्यामुळं कारमध्ये बसलेले प्रवासी घाबरले होते. तरीही हिंमत करून या वाघाच्या जोडीचे रात्रीच्या अंधारात फोटो घेतले.
ताडोबात वाघांची संख्या वाढत आहे. त्यामुळं धोका निर्माण झाला. कुणी जंगलात गेले की, वाघ हल्ला तर करणार नाही, अशी भीती असते. जंगलाशेजारील गावांत हा वाघांचा धोका जास्त आहे. परंतु, आता वाघ वर्दळीच्या ठिकाणी येऊ लागल्यानं या वाघांपासून कसं सुरक्षित राहायचं असा प्रश्न पडला आहे. वनविभागानं वाघांवर लक्ष ठेवावं. नागरिकांना या वाघांपासून नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.