Nitesh Rane: औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही ते ठरवा; नितेश राणेंचा संभाजी छत्रपतींना सवाल

| Updated on: May 19, 2022 | 6:11 PM

Nitesh Rane: मराठा समाज संघटीत होत नाही ही तक्रार आहे. त्यावेळचा काळ वेगळा होता. अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर त्यावेळी तलवार उचलावी लागत होती.

Nitesh Rane: औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही ते ठरवा; नितेश राणेंचा संभाजी छत्रपतींना सवाल
औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही ते ठरवा; नितेश राणेंचा संभाजी छत्रपतींना सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कुडाळ: औरंगजेबाच्या कबरीवरून (aurangzeb tomb)वाद सुरू झालेला असतानाच राज्य सरकारने (maha vikas aghadi) पाच दिवसांसाठी औरंगजेबाच्या कबरीवर येण्यास पर्यटकांना मनाई केली आहे. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही या कबरीवरून सवाल केला आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांना आपण दोन पायावर जाऊ देतो हीच आपली शोकांतिका आहे. संभाजी महाराजांना ज्यांनी तडफडून मारलं त्यांची कबर महाराष्ट्रात कशाला हवी? पुरातन खातं विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीला प्रतिसाद देत नाही. परंतु औरंगजेबाची कबर काही घडू नये म्हणून पाच दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवतात. कशी माणसे या खात्यात आहे बघा, असा संताप नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे. मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे यांनी हा सवाल केला. तसेच कबरीवर पर्यटकांना येण्यास मज्जाव करण्याऐवजी कबर ठेवताच कशाला? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणाऱ्यांसोबत जायचं की नाही हे संभाजी छत्रपती यांनी ठरवावं, असा खोचक सवालही त्यांनी केला.

नितेश राणे यांनी यावेळी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. मराठा समाज संघटीत होत नाही ही तक्रार आहे. त्यावेळचा काळ वेगळा होता. अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर त्यावेळी तलवार उचलावी लागत होती. आपली आता लढाई आर्थिक उन्नतीसाठी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अख्ख्या राज्यात मी आणि कोंढरे साहेब फिरलो. अण्णासाहेब महामंडळाची आज काय स्थिती आहे? सारथीला निधी उत्पन्न करून दया म्हणून वारंवार मागणी करतोय, असं नितेश राणे यांनी सांगितलं. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. दुसरा कुठला समाज आहे? असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

फक्त शिवाजी महाराज एकत्र आणू शकतात

रत्नागिरीतील एका कार्यक्रमावरही त्यांनी मिश्किल टीका केली. या कार्यक्रमाची पत्रिका पाहिली त्यावर विनायक राऊत, वैभव नाईक, नितेश राणे हे एका व्यासपीठावर येणार असं दिसलं. एकमेकांची तोंडेही न बघणाऱ्या लोकांना फक्त शिवाजी महाराजच एकत्र आणू शकतात, असंही ते म्हणाले.

संभाजीराजेंनी ठरवावं

दरम्यान, संभाजी छत्रपती यांना राज्यसभेसाठी राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. तर शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून संभाजी छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरिता वर्षा निवासस्थानी गेले आहेत. त्यावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण दिलं. त्यांच्यासोबत जायचं की नाही ते संभाजीराजेंनी ठरवावं, असा टोला त्यांनी लगावला आहे.

औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद शहरात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला धोका निर्माण झाल्यामुळे सध्या पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर पाच दिवसांकरता कबर बंद सुद्धा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कबरीच्या पाठीमागच्या बाजूने सुद्धा कबरीला सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी प्रशासन घेत आहे.

तर आणखी पाच दिवस कबर बंद

औरंगजेबाची कबर पाच दिवसंकरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरातत्त्व विभागाने कबर पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कबर परिसरात वातावरण बिघडण्याची शक्यता असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती न सुधारल्यास आणखी पाच दिवस कबर बंद राहणार आहे. आज सकाळपासून औरंगजेबाची कबर बंद करण्यात आली आहे.