नाशिक : नाशिकमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. नाशिकमध्ये पोलीस दल काय करतय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. त्याला कारणही तसच आहे. 24 तासांच्या आत नाशिकमध्ये वाहन तोडफोडीची दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे नाशिककर दहशतीमध्ये आहेत. नाशिकमधील ही परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. 24 तासांपूर्वी नाशिकच्या विहितगावमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.
विहितगावमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 7 ते 8 गाड्या पेट्रोल टाकून जाळण्यात आल्या होत्या. आता नाशिक रोड परिसरात पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची घटना घडली आहे.
कोयत्याने काचा फोडल्या?
नाशिकमध्ये पोलीस प्रशासन आहे की, नाही? असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत. दत्त मंदिर चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोडीची घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या 6 ते 8 जणांच्या टोळक्याने हैदोस घातला. वाहनांची तोडफोड केली. कोयते आणि नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवण्यात आली. कोयत्याने कारच्या काचा फोडण्यात आल्या.
गुंड पोलिसांवर भारी पडतायत का?
कोयते, तलवारी नाचवत हे गुंड शहरभर फिरत असताना, पोलीस काय करतायत? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शहरातील गुंड पोलिसांवर भारी पडतायत का? असही चित्र यातून निर्माण होतय. आता यामध्ये गृहमंत्र्यांनी लक्ष घालाव अशी मागणी होत आहे. 12 जुलैलाही सिडको परिसरात 16 वाहनांची तोडफोड झाली होती.