नाशिक | 19 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक विधान केलं आहे. त्यामुळे वादाला फोडणी बसण्याची शक्यता आहे. ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे नसतात, असं सांगतानाच काहींना सरस्वती आवडते तर काहींना शारदा आवडते. आम्हाला मात्र, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीच आम्हाला शिक्षणाची दारे खुले केली आहेत, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला फोडणी बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ येथील एका कार्यक्रमात बोलत होते. आपल्याला शिक्षण दिलं. शिक्षणाची द्वारे ज्यांनी खुले केली ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांनी. त्याचं कायद्यात रुपांतर केलं ते बाबासाहेब आंबेडकर यांनी. भाऊराव पाटील आदी महापुरुषांनी आपल्याला शिक्षणाची दारे उघडून दिली. बाकीच्यांना सरस्वती आवडते, काहींना शारदा आवडते. आम्ही काय पाहिलं नाही. आम्हाला काही त्यांनी शिक्षण दिलं नाही. आम्हाला शिक्षण दिलं ते या महापुरुषांनी दिलं. त्यामुळे ते आमचे देव आहेत. ते तुमचेही देव असले पाहिजेत. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले.
मी ब्राह्मणांवर टीका करत नाही… ब्राह्मण वर्ग सोडल्यास तुम्ही आम्ही शुद्र. त्यानंतर मग अतिशुद्र. शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण वर्गातील फक्त पुरुषांना. महिलांनाही नाही. केवळ दीड टक्के लोकांपुरतंच शिक्षण मर्यादित होतं, असंही भुजबळ यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. त्यांचे नाव संभाजी भिडे नव्हे संभाजी कुलकर्णी आहे. ब्राह्मण समाजाने वाईट वाटू नये. ब्राह्मण समाजात संभाजी शिवाजी असे नाव ठेवत नाही. भिडे म्हणतो, माझ्या बागेतील अंबे खा, मुले होतील. मग मेडिकल कॉलेज कशाला? बाबासाहेबानी सांगितले शिक्षण घ्या, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आमच्या सरकारला ओबीसीसाठी घरे बनवायला सांगितले. त्यात मराठा कुटुंबातील लोक आहेत. कुणबी देखील त्यात आहेत. मी काल गणपती, दिवाळी, दसऱ्यासाठी आनंदाचा शिधा देण्याचे सांगितले. मी त्या खात्याचा मंत्री आहे. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जेवढ्या सुविधा असतील त्याचा फायदा तुम्ही घ्या. ते आम्ही खिश्यातून देत नाही. तुमच्याच पैशांचे आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आपले देव कोण? ज्यांनी आपल्याला मोठे केले. आपल्यसााठी कष्ट केले ते. सावित्री बाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. आजच्या पुरस्कारात 2 ते 3 मुले होती. मुली जास्त होत्या. ही सावित्रीबाई फुले यांची देण आहे. त्यांनी मुलींना शिक्षणाचा मार्ग दाखवला म्हणून मुली शिकल्या. त्यामुळे शिक्षण हे महत्त्वाचं आहे. समाजातील प्रत्येक वर्गाने ते घेतलं पाहिजे, असं ते म्हणाले.