मालेगाव : आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणजे लग्न. लग्नाचा हा सोहळा अविस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येकजण काहीतरी खास प्रयत्न करतो. असाच एक वेगळा प्रयत्न नाशिकच्या मालेगावमधील बारा बलुतेदार मित्र मंडळाचे बंडूकाका बच्छाव यांनी घडवून आणलाय. लग्नात आतापर्यंत नवरदेवाने केलेली बुलेटवरील एन्ट्री किंवा नवरीने डान्स करत केलेली एन्ट्री पाहिली असेल. मात्र हेलिकॉप्टरने एन्ट्री घेणे विरळच. त्यामुळे हौसेला मोल नाही, अशीच प्रतिक्रिया सध्या मालेगावात उमटू लागली आहे.
लखमापूर येथील वर चि. लोकेश आणि चंदनपुरी येथील वधू पूर्वी या आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या लग्न सोहळ्यासाठी दोघा वधू-वरांची लग्नस्थळाजवळ एन्ट्री ही थेट हेलिकॉप्टरमधून करण्यात आली. मालेगाव येथील आदिवासी कुटुंबातील वर आणि वधू हेलिकॉप्टरने दाखल झाल्याची ही घटना पहिल्यांदाच घडली.
मालेगाव शहरातल्या मसगा महाविद्यालयाच्या मैदानावरून सजवलेल्या रथात निघालेल्या या आगळ्या वेगळ्या वर-वधुंची मिरवणूक पाहण्यासाठी बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
वधूचे वडील म्हणाले, बंडूकाकाच्या मुलीचं लग्न थाटामाटात झालं. तेव्हा म्हटलं होतं. माझ्या पोरीचपण लग्न असचं थाटामाटात झालं पाहिजे. बंडूकाका म्हणाले, तुला काय पाहिजे. तेव्हा हेलिकॅप्टरनं मुलगी-जावई आणण्याचा शब्द बंडूकाकांनी दिला होता. तो पूर्ण केला. आदिवासीचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळेआदिवासी समाज तसेच माझे पवार कुटुंबीय बंडूकाका यांचे ऋण कधी विसरणार नाही.
वधू मुलगी म्हणाली, बंडूकाकांनी माझ्या वडिलांना शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला. आम्हाला ने-आण करण्यासाठी हेलिकॅप्टर आणला. त्यामुळे खूप बरं वाटलं. स्वप्न पूर्ण झालं. पुन्हा परत हेलिकॅप्टरने जाणार आहे.
बंडूकाका बच्छाव म्हणाले, हा मित्र माझा जीवाभावाचा आहे. गेल्या ३० वर्षांपासून तो माझ्याशी एकनिष्ठ होता. आदिवासीचा जावई-मुलगी हेलिकॅप्टरने यावी, अशी या आदिवासी बापाची इच्छा होती. ती इच्छा माझ्याकडून पूर्ण झाली. असे मत बंबूकाका बच्छाव यांनी व्यक्त केले.