नागपूर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा डौलाने फडकावा, यासाठी सर्व नागरिक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर (Yogesh Kumbhejkar) यांनी आज येथे केले. या उपक्रमानिमित्त काटोल रोड (Katol Road) स्थित जिल्हा परिषदेच्या माजी शासकीय शाळेत आयोजित कार्यक्रमात कुंभेजकर बोलत होते. नागपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी राजश्री घोडके (Rajshree Ghodke), मुख्याध्यापिका सुजाता आगरकर, श्रीमती खाडे, श्रीमती मेश्राम यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावा याकरिता या उपक्रमामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. शाळकरी मुला-मुलींच्या मनात देशप्रेम, देशभक्तीचे बालसंस्कार व्हावे, या हेतूने शाळा-महाविद्यालयांत त्यांना तिरंग्याचे वितरण करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांना तसेच शेजारी व इतरांना तिरंग्याचे महत्त्व पटवून द्यावे. आपल्या घरांवर तिरंग्याचा अवमान होणार नाही याची दक्षता घेत, तिरंगा व्यवस्थित फडकविला जावा या संदर्भात माहिती द्यावी. येत्या 15 ऑगस्ट रोजी देशाला स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सर्वांनी आपापल्या घरांवर तिरंगा झेंडा फडकावून त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. राष्ट्रप्रतिष्ठा अवमान कायदयानुसार ध्वज संहिता जाहीर करण्यात आली असून त्याचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे. शिक्षकांनीही जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 27 व 28 जुलै रोजी या शाळेत निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री. कुंभेजकर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करुन गौरव करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त 9 ते 17 ऑगस्टदरम्यान प्रभात रॅली, स्वच्छता मोहीम, गावांचा विकास, वृक्षारोपण, मोबाईलचे दुष्परिणाम, ध्वजारोहण, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, लसीकरण मोहीम, विविध स्पर्धांचे आयोजन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हर घर तिरंगा उपक्रम साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका श्रीमती आगरकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून दिली.
ध्वजसंहितेनुसार, आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. तसेच त्याची ठेवण 3:2 या प्रमाणात असावी. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील, याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो.