मुंबई / 11 ऑगस्ट 2023 : मुंबईसह महानगर क्षेत्रातील सहा महापालिकांच्या हद्दीत रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या प्रश्नाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने आज सहा महापालिकांच्या आयुक्तांना फैलावर घेतले. त्याचबरोबर वर्षभरापूर्वी दिलेला आदेशाचे पालन न केल्याबद्दल राज्य सरकारची कानउघडणी केली. ‘सरकार म्हणून महापालिकांच्या हद्दीतील नागरिकांची काळजी घेण्यासही तुम्ही बांधील आहात. तुम्ही जबाबदारी झटकू शकत नाही. राज्य सरकारचे कर्तव्य न्यायालय करणार नाही. खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निर्देशांचे गांभीर्याने पालन करा’, असे निर्देश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी 29 सप्टेंबर रोजी होणार आहे.
रस्त्यांवर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पडल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिकेसह महानगर क्षेत्रातील सहा पालिकांच्या आयुक्तांना समन्स बजावले होते. न्यायालयाच्या समन्समुळे आज मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त भाऊसाहेब दांगडे, वसई विरार मनपा आयुक्त अनिल कुमार पवार, मीरा भाईदर मनपा आयुक्त संजय काटकर न्यायालयात हजर राहिले होते.
जागोजागी पडलेल्या खड्ड्यांबाबत मुख्य न्यायमूर्तींनी सर्व आयुक्तांना धारेवर धरले. खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यात उदासीनता का असा खडा सवाल मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांनी उपस्थित केला. त्यावर बृहन्मुंबई महापालिकेसह अन्य पालिकांनी खड्ड्यांचे खापर पावसावर फोडले. मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस पडला असून त्यामुळे प्रत्येक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. पावसाचा परिणाम होऊन खड्डे बुजवण्याचे काम देखील निष्प्रभ ठरू लागले आहे, असा दावा पालिकांच्या वतीने करण्यात आला.