मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार गंभीर नसल्याची टीका केली. राज्यात यावर्षी प्रचंड कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांचे भाऊ उपमुख्यमंत्री अजित पवारही सत्तेत सहभागी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा गट सत्तेत सहभागी झालाय. हा संपूर्ण गट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना मानणारा आहे. पण तरीही त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या गटामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांचा समावेश आहे. पक्षाचा एक भलामोठा गट सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या या मागणीला महत्त्व आहे. पण तरीही राज्य सरकार सुप्रिया सुळेंच्या मागणीला किती महत्त्व देतं हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
“केंद्र सरकारच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप असतं. जे केंद्रात होतं तेच दुर्देवाने महाराष्ट्रात होत आहे, ही अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. हे जुमल्याचं सरकार आहे. या सरकारने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करु, असं आश्वासन दिलं. पण दुप्पट सोडा, जे आहे ते देखील दिलं जात नाही. याउलट शेतकऱ्यांचं खच्चीकरण केलं जात आहे”, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला.
“मी आठ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे. तातडीने राज्यात दुष्काळ झाला पाहिजे. जनावरांसाठी पुरेसा चारा नाही. शेतीसाठी पाणी नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करा आणि दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे”, अशी मोठी मागणी सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
“मी सातत्याने तांदुळाबद्दल बोलत आहे. कांद्याच्या प्रश्नावर तुम्ही आता बोलत आहात. मी गेल्या चार महिन्यांपासून बोलतेय. तुम्ही माझे ट्विट बघा. माझं आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत या विषयावर अनेक मतभेद झाले आहेत. मी सातत्याने पियूष गोयल यांना विनंती करत होते की, कांद्याच्या निर्यातीसाठी परवानगी द्या. पण त्यांनी त्याकाळात कांद्याला परवानगी दिली नाही. याउलट कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के टॅक्स लावण्याचा पाप या सरकारने केला. विशेष म्हणजे कॉर्पोरेट टॅक्स आणि हाय इनकमवाल्यांना 30 टक्क्याच्या आत टॅक्स आहे. पण शेतकऱ्याच्या मालाला 40 टक्के टॅक्स लावला. हा कुठला न्याय आहे?”, असा सवाल सुळे यांनी केला.