मुंबई : पहिल्या पावसाने मुंबईत जलमय झाली आहे. अशातच काल मुंबईतील घाटकोपरमध्ये इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. काल सकाळी ही इमारत कोसळली. यात चौघेजण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील दोघांना कालच बाहेर काढण्यात यश आलं. पण या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांसाठी कालपासूनच बचाव कार्य सुरू होतं. आज या दोघांना बाहेर काढण्यात आलं. मात्र या दोघांचा मृत्यू झाला आहे. तसंच एक कुत्राही या इमारतीत अडकला होता. त्याचाही मृत्यू झाला आहे.
घाटकोपरमधल्या राजावाडी परिसरातील चित्तरंजनगरमध्ये काल सकाळी 9 वाजेच्या सुमारात इमारत कोसळली. राजावाडी कॉलनीमधील बिल्डिंग नंबर बी / 7 /166 ही तीन मजली इमारत कोसळली.
इमारतीच्या जमिनीचा काही भाग खचल्याने वरच्या तीन मजल्यांनाही तडे गेले. या इमारतीत 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. फायर ब्रिगेडचे जवानांनी इमारतीमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यातील दोघांना कालच बाहेर काढण्यात यश आलं.
घाटकोपरमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना 21 तासांनंतर बाहेर काढण्यात आलं आहे. 21 तास चाललेल्या बचावाकार्यानंतर NDRF च्या टीमने या दोघांना बाहेर काढलं आहे. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आई आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. नरेश पलांडे वय 56, अल्का महादेव पलांडे वय 94 अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. तसंच अडकलेल्या कुत्र्याचाही मृत्यू झालाय.
घाटकोपरमध्ये झालेल्या या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. या इमारत दु्र्घटनेमुळे तिथे लावण्यात आलेल्या गाड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे.
पहिल्याच पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. अंधेरीतील सबवे परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. पाणी वेगाने पुढे सरकत होतं. अशात एक महिला रस्ता ओलांडू लागली. पण या पाण्याच्या वेगामुळे ती वाहून जाऊ लागली. पण इतक्यात तिथं असणारे लोक तिच्या मदतीला आले. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी महिलेचा अखेर जीव वाचला.