मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींदरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. ही बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मंत्र्यांच्या सुरक्षेबाबत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची. राज्याच्या गृह विभागाने सहा मंत्र्यांच्या सुरक्षेच्या काळजीपोटी मोठा निर्णय घेतलाय.
शिंदे-फडणवीस सरकारने स्वतःच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांना वाय प्लससह दर्जाच्या सुरक्षेसह एस्कॉर्ट कॅटेगिरीची सुविधा पुरवली आहे. त्यांच्या निर्णयावर आता विरोध काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात होती.
विशेष म्हणजे राज्य सरकारने शिवसेना शिंदे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवली होती. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मविआ नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर आता राज्य सरकारकडून सहा मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून ‘या’ मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, सहकार मंत्री अतुल सावे आणि महिला बालकल्याण मंत्री मंगल गावात लोढा यांना वाय प्लस विथ एस्कॉर्ट सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.
Y प्लस दर्जाच्या सुरक्षेत एकूण 11 सुरक्षा रक्षक असतात. यामध्ये दोन ते चार कमांडोचा समावेश असतो. या सुरक्षेतील कर्मचाऱ्यांच्या ताफ्याच्या दोन ते तीन वाहनं असतात.