मोठी बातमी! ईडीच्या हाती तब्बल 150 कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्रे, ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?

| Updated on: Jun 22, 2023 | 7:06 PM

ईडी अधिकाऱ्यांकडून मुंबईत धाडसत्र सुरु आहे. ईडीने कालपासून आतापर्यंत 18 पेक्षा जास्त धाडी टाकल्या आहेत. या धाडींमधून ईडी अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाची माहिती लागल्याचं समोर आलं आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल 150 कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्रे लागले आहेत.

मोठी बातमी! ईडीच्या हाती तब्बल 150 कोटींच्या मालमत्तेचे कागदपत्रे, ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार?
हिरो मोटोकॉर्पच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या घरावर ईडीने काल धाडी टाकल्या. ईडी अधिकारी सकाळी 9 वाजता सुरज चव्हाण यांच्या घरी दाखल झाले होते. अधिकाऱ्यांनी दिवसभर सुरज चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेतली. ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल 17 तास सुरज चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेतली. याशिवाया ईडीने काल दिवसभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली. या तपासात ईडी अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाचे कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आली आहे.

ईडीच्या हाती नेमकं काय लागलं?

ईडीच्या हाती कालच्या छापेमारीत तब्बल 150 कोटी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे लागली आहेत. तसेच 15 कोटींची एफडी असलेली कागदपत्रेही ईडीच्या हाती लागली आहेत. ईडी अधिकाऱ्यांनी या कारवाईत तब्बल अडीच कोटींची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. या कारवाईत ईडी अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.

सुरज चव्हाण यांचे चॅट ईडीच्या हाती

विशेष म्हणजे या प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. सुरज चव्हाण यांचं व्हाट्सअॅप चॅट ईडीच्या हाती लागलं आहे. सुरज चव्हाण यांचे सुजीत पाटकर, राजीव साळुंखे, संजय शाहा यांच्यासोबत चॅट ईडीच्या हाती लागले आहेत. लाईफलाईन कंपनीला चव्हाणांनी कंत्राट मिळवून दिल्याचा ईडीला संशय आहे.

नेमकं प्रकरण काय?

कोरोना संकट काळात सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला बेकायदेशीरपणे कंत्राट देण्यात आलं होतं, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याच आरोपांप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने याप्रकरणी काल दिवसभरात तब्बल 16 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये तत्कालीन पालिका उपायुक्तांचा देखील समावेश आहे. ईडीच्या या धाडसत्रामुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे. ईडीकडून आजही धाडसत्र सुरुच आहे.

ईडीने या प्रकरणाचा चौकशीचा मोर्चा आता मुंबई महापालिकेकडे वळवला आहे. ईडी अधिकारी आज चौकशीसाठी मुंबई महापालिका कार्यालयात दाखल झाले. त्यांनी महापालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती खरेदी विभागाच्या दोन अधिकाऱ्यांची चौकशी केली.

दरम्यान, सुरज चव्हाण यांनी ईडीच्या धाडीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ईडी अधिकाऱ्यांनी संपूर्ण घराची तपासणी केली. माझा मोबाईलही त्यांनी घेतलेला आहे. तपास यंत्रणा सर्व तपास करुन मला चौकशीसाठी बोलावणार आहेत”, अशी प्रतिक्रिया सुरज चव्हाण यांनी दिली. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर सुरज चव्हाण यांची भेट घेतली आहे. त्यांनी सुरज यांच्या चौकशी प्रकरणी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केलीय.