मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री दीपाली सय्यद अखेर निवडणूक लढणार आहे. विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढण्याची दीपाली सय्यद यांनी तयारी सुरू केली आहे. एका बड्या नेत्याची भेट घेतल्यानंतर अखेर दीपाली सय्यद निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता दीपाली सय्यद यांनी मतदारसंघाचाही शोध सुरू केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दीपाली सय्यद या महाराष्ट्राच्या विधानसभेत किंवा संसदेत दिसण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते आहेत, तेवढेच रस्त्यावर खड्डे आहेत, अशी खोचक टीकाही दीपाली सय्यद यांनी केली आहे.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्या शिंदे गटात जाणार होत्या. पण भाजपने त्यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा शिंदे गटात प्रवेश होऊ शकला नव्हता. त्यानंतर त्यांनी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नव्हता. त्यामुळे त्या काहीशा सक्रिय राजकारणातून अडगळीत पडल्या होत्या. मात्र, आता त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवडणूक मैदानात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा किंवा विधानसभेला परिस्थिती पाहून दीपाली सय्यद यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दीपाली यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. मी शिंदे गटासोबत आहे. मी शिवसेनामध्येच आहे. त्यामुळे मला वेगळ्या पक्षप्रवेशाची गरज नाही, असं दीपाली सय्यद म्हणाल्या. त्या कुठून निवडणूक लढवणार याचा शोध सुरू आहे. त्या लोकसभा किंवा विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.
यावेळी दीपाली सय्यद यांनी मनसेच्या आंदोलनावर टीका केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी. राज्यभरात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे! दोन दिवसाचे काम आहे. उगाच जेलमध्ये महिना भर खाऊन देशाचे नुकसान कशाला करता? बाहेर स्टंटबाजी कशाला करता युवा नेत्यांना घराबाहेर काढून कामाला लावा, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे.
दरम्यान, दीपाली सय्यद यांच्या विधानार मनसेच्या पदाधिकारी नेहा भगत यांनी जोरदार टीका केली. दीपाली सय्यद ही कोण आहे हेच माहीत नाही. त्या कुठल्या पक्षात आहेत हे त्यांना स्वतःलाच माहीत नाही. ना घर की ना घाट की असं ज्या व्यक्तीचं झालेला आहे त्या आम्हाला आता शिकवत आहेत. अशा फालतू व्यक्तींकडे आम्हाला बघायला वेळ देखील नाही आणि आम्ही ऐकत सुद्धा नाही. आम्हाला काय काम करायचं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. अशा फालतू व्यक्तींकडे आम्ही लक्ष देत नाही, अशी टीका नेहा भगत यांनी केली.