मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला (ketaki chitale) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी चांगलंच फटकारलं. कोणी तरी बाई आहे. तिने शरद पवारांवर विचित्रं कमेंट केली. घरी आईवडील, आजी-आजोबा आहे की नाही? संस्कार होतात की नाही? किती काही झालं तरी बाई तुझा संबंध काय? कुणावर बोलतेस? काय बोलतेस? हे तुझं वक्तव्य असेल तर तुझ्या मुलांचं काय होणार? ती काय होणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. हा सुसंस्कृतपणा आहे तो आपल्या देशातून राज्यातून जात आहे. ते जपायचं आहे. ते खरं हिंदुत्व आहे. श्लोक म्हणायचे आणि तिकडे वाटेल ते करायचं. म्हणजे करून करून भागले आणि देवपुजेला लागले हे हिंदुत्व. या सगळ्या चित्रविचित्रं गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे. हे सांगणारं आज कोणी दिसत नाही. ते आपल्याला करायचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. वांद्रे येथील बीकेसी मैदानावर शिवसेनेची विराट रॅली झाली. या रॅलीला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी केतकी चितळेवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेत चौफेर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेवरही त्यांनी जोरदार टीका केली. तुमच्याप्रमाणे मलाही मोकळं वाटतंय. बऱ्याच दिवसानंतर मैदानात उतरलो आहे. मोकळा श्वास घेत आहे. अनेक विषयावर बोलायचं आहे. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय हे महाराष्ट्रात राहून कळलं नाही. त्यांच्यासाठी मध्येमध्ये बोलावं लागतं. विषय बरेच आहेत. सर्व पक्ष आहेत. त्यातही खोटा हिंदुत्वाचा बुरखा घेतलेला पक्ष सोबत होता. तो देशाची दिशा भरकटवत आहे. तुम्ही मला गदा दिली. मध्ये बोललो होतो हिंदुत्व कसं आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे, असं शिवसेनाप्रमुख सांगायचे. आपलं हिंदुत्व गदाधारी तर इतरांचं घंटा धारी. बसवा हलवत घंटा. गदा पेलवायला ताकद हवी. हनुमान, भीमसारखी. आमचं हिंदुत्व गधाधारी असं फडणवीस म्हणाले. तो गधा आम्ही अडीच वर्षापूर्वी सोडून दिला. आम्ही गाढव सोडून दिली. घोड्याच्या आवेशात होते. त्या गाढवाने लाथ मारण्यापूर्वीच आम्ही सोडून गेलो. बसा बोंबलत, असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले.
हिंदुत्वाचे रक्षक असल्याचा आवेश आणला जातो. मग समोर बसलेले कोण आहेत? यांच्या धमन्यात शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचं रक्त पेरलं आहे. हा हिंदु् मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही. कुणाची बिशाद आहे हिंदुत्वावार घाला घालण्याची. बघतो ना मी. एक दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यावर बोललं पाहिजे. स्लीप ऑफ टंग म्हणून सोडणार नाही. 1 मे आपण साजरा करत होतो. तेव्हा फडणवीस चुकून बोलले. ते बोलून गेले मुंबई स्वतंत्र करणार. मालकाची इच्छा बोलून गेले. तुमच्या मालकासकट तुमच्या सतराशे साठ पिढ्या जरी आल्या ना हा जिवंतपणा या मर्द मावळ्यात आहे, तो कदापि मुंबई वेगळी होऊ देणार नाही. मुंबई मराठी माणसाने रक्त साांडवून मिळवली आहे. आंदण म्हणून मिळाली नाही. मुंबईला वेगळं करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
आता दाऊदच्या मागे लागलेत. दाऊद म्हणाला मी भाजपमध्ये येतो तर मंत्री म्हणून त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणून त्याच्या मागे लागले असतील. बघ ईडीबिडीमुळे लोकं कसे आमच्यात येत आहेत. आमच्यात ये, मग तुला मंत्री बनवतील. नंतर म्हणतील दाऊद तसा काही नाही हो. दाऊद म्हणजे गुणाचा पुतळा आहे. ही अशी चित्रंविचित्रं भानगडी करतात हे अन् हनुमान पुत्रं तरी कसे म्हणतात. ज्या हनुमानाने पेटत्या शेपटीने लंका जाळली होती. तुम्ही बाबरी पाडल्यानंतर शेपट्या आत घालून बसला होता. तुमची वितभर नाही. कित्येक मैल पळापळ झाली होती, अशी टीकाही त्यांनी केली.