मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज थेट भाजपची (BJP) मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरच टीका केली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीवरूनही भाजपला टोले लगावले. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच संघावर (RSS) थेट टीका केली. तुम्ही तुमच्या सभेत भगव्या टोप्या घालून आले. तुमचा आणि भगव्या टोप्यांचा संबंध काय? आहे तर मग संघाची टोपी काळी कशी? संघाचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय? असे सवाल करतानाच रामभाऊ प्रबोधिनीतून तयार झालेले हेच लोकं आहेत का? असे सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. हिंदुत्व हे भगव्या टोप्यात नसतं. टोपीखाली जो मेंदू असतो त्यात हिंदुत्व असतं, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. वांद्रे येथील बीकेसी मैदानावर शिवसेनेची विशाल रॅली पार पडली. या रॅलीला संबोधित करताना त्यांनी संघावर जोरदार हल्ला चढवला.
ते भगव्या टोप्या घालून आले होते. हिंदुत्व टोप्यात नसतं. मेंदूत असतं. तुम्ही भगव्या टोप्या दाखवत असाल तर संघाची टोपी काळी का? ही अशी विकृत माणसं आहेत. आम्ही म्हणजेच हिंदु हे आम्हाला सांगायची गरज नाही. तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार दिला. हे विखार देत आहेत. ही विखारी माणसं देशाचा कारभार काय करणार? हे मनोरुग्ण आहेत. आपण दुर्देशेकडे जात आहोत. ज्याच्यावर विश्वास टाकला. तेच केसाने गळा कापत असतील तर विश्वास कुणावर ठेवायचा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
आपली सभा जिथे सुरू आहे. तिथे ते बुलेट ट्रेन आणत आहेत. देशातील पहिली बुलेट ट्रेन. अहमदाबाद ते मुंबई अशी ही ट्रेन धावणार आहे. कुणाला हवी बुलेट ट्रेन? हा डाव मुंबई तोडण्याचा डाव आहे. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे तुम्ही काय करणार. मुंबई काय पारतंत्र्यात आहे का? फडणवीसांना विचारायचं आहे. तुमचा पक्ष नव्हता आणि आमचा पक्ष नव्हता. तेव्हा तुमची मातृसंस्था संघ होता. संघाला 100 वर्ष होतील. स्वातंत्र्य पूर्व काळात संघ अस्तित्वात होता. एकदाही संघ स्वातंत्र्य लढ्यात उतरला नाही. असेल तर दाखले दाखवा. त्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही नव्हता, असा हल्लाही त्यांनी चढवला.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालला होता. त्या लढ्यातही नव्हता. हा होता. कसे होता? तर जनसंघ म्हणून होता. तेव्हा शिवसेना नव्हती. पण शिवसेनाप्रमुख आणि माझे काका श्रीकांत ठाकरे प्रबोधनकारांना मदत करत होते. माझे अजोबा पाच शिलेदारांपैकी एक होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे हा लढा उभा करण्यासाठी निवडणूक लढवली गेली. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. त्यातून कोण फुटलं माहीत आहे तुम्हाला? जनसंघ. म्हणजे यांचे पूर्वीचे बाप. जनसंघ. जागावाटपावरून भांडण झालं आणि संघ त्यातून फुटला, अशी टीका त्यांनी केली.
मुंबईत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आहे. तिथे त्यांचं चिंतन कुंथन चालतं. कधी चिंतन करतात, कधी कुंथत बसतात. मी तिथे गेलो होतो. प्रमोद महाजन जबाबदारी पार पाडत होते. उत्तम साहित्य होतं. मार्गदर्शन उत्तम करायचे. मी त्यांना विचारलं इथे काय होतं? तर सांगितलं आम्ही कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करतो. कार्यकर्ता घडवतो. कार्यकर्ता कसा असावा, राजकारण कसं असावं याचं बौद्धिकं देतो. आता प्रश्न पडतो प्रबोधिनी प्रबोधिनी जी काय आहे तिकडे हे शिकवलं का? हे तुमचं प्रोडक्ट आहे का? ही तुमची पिढी आहे का? त्यात जे काही होतं ते गेलं कुठे? प्रबोधिनीत शिकलेले गेले कुठे दिसतच नाही. आता जबाबदारी कुणावर आहे. सहस्त्रबुद्धे गेले वर. वर म्हणजे दिल्लीत. आता कुणाकडे आहे कुणालाच माहीत नाही. एवढं खोटंनाटं बोलायचं. आपण कमी कुठे पडतो. आपण खोटं नाही बोलू शकत. आणि खोटं बोलणं त्यांच्या हिंदुत्वात बसतं आपल्या हिंदुत्वात नाही. हा फरक आहे त्यांच्या आणि आपल्या हिंदुत्वामध्ये आहे, असं त्यांनी सांगितलं.