मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप निवडणूक घ्यायला घाबरत असल्यानेच ही निवडणूक स्थगित केली असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मनसे, ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने या मुद्द्यावरून भाजपला घेरलेलं असतानाच आता ठाकरे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायलाही मिळत आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणुकीवरून मनसेवर टीका केल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनीही थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच नाव घेऊन आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्याने आता अमित विरुद्ध आदित्य अशी जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना मनसेबाबत विचारण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मनसेवरही टीका केली. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना अशी म्हण आहे. ज्यांना माहिती नाही त्यात कशाला जायचं. काही लोकांना थेरपीची गरज असते. प्रेमाची गरज असते. ते मी त्यांना देत असतो. भाजपमधून त्यांना ते मिळत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.
निवडणुका रद्द होणं हे लोकशाहीसाठी भयानक आहे. विद्यापीठाचा निर्णय बेकायदेशीर आहे. या आधी असा प्रकार कधीच झाला नव्हता. फक्त नैसर्गिक आपत्ती दरम्यान निवडणुका रद्द करण्याची परवानगी असते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या टीकेबाबत अमित ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर, निवडणुकीवेळी हे लपून बसतात. स्थगिती मिळाल्यावर बाहेर येतात बिळाच्या. निवडणुकीत उतरा ना. तुम्ही कुणाचं नाव घेतलं आता आदित्यचं ना…हं… त्यांच्याविषयीच बोलतो, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली. आपण सर्व पक्ष मैदानात उतरू. आणि लोकांना ठरवू द्या. त्यांच्या 10 सदस्यांना गेल्या पाच वर्षातील पाच कामे विचारा. कोणत्या जोरावर बोलत आहात? स्थगिती मिळाल्यावर का बोलत आहात? असा सवालही त्यांनी आदित्य ठाकरे यांना केला.
दरम्यान, निवडणुकीला का स्थगिती दिली? याबाबत मुंबई विद्यापीठाने खुलासा केला आहे. मतदार यादीत विसंगती असल्याची तक्रार मिळाली. त्यामुळे आम्ही निवडणुकीला स्थगिती दिली. तात्काळ कारवाई करणं शक्य नाही. चौकशीसाठी वेळ लागेल. तपासणी करण्यात येईल. पुढील निवडणुकीबाबत निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर माहिती मिळेल, असं विद्यापीठाने म्हटलं आहे.