मुंबई | 28 ऑगस्ट 2023 : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तब्बल 20 वर्षानंतर तेलगी प्रकरणावर भाष्य केलंय. त्या प्रकरणात माझा राजीनामा का घेतला? असा सवाल भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना केला. मात्र याआधी याच प्रकरणावरुन भुजबळांनी कुणावर टीका केली होती? कालच्या सभेत जो काही काळ गोंधळ झाला, तो नेमका का झाला? याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका करताना तेलगीपासूनची प्रकरणं काढली. भुजबळ बोलत असतानाच समोर गोंधळ सुरु झाला. हा गोंधळ पवारांवरच्या टीकेमुळे होत असल्याची चर्चा झाली. मात्र हे सारं जेव्हा सुरु होतं तेव्हा भुजबळ काय बोलले, ते आपल्याला ऐकूच आलं नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय.
एकीकडे भुजबळ अप्रत्यक्षपणे म्हणतायत की, शरद पवार अजित पवारांवर टीका करत नाहीत. दुसरीकडे अजित पवार भुजबळांच्या आरोपांवरुन शरद पवारांवर बोलत नाहीत, हा संभ्रम आहे, की संभ्रम पसरवला जातोय, हे कोडं बनलंय. भुजबळ तेलगीवरुन काय म्हणाले, त्याआधी तेलगी प्रकरण काय होतं, ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे.
अब्दुल करीम तेलगी हा बोगस स्टॅम्प पेपर घोटाळ्यातला मुख्य दोषी होता. रेल्वेत फळं-भाजीपाला विकून तेलगीनं शिक्षण घेतलं. काही काळ सौदीत नोकरी करुन तो भारतात परतला. त्याने 2001 ला इंदूरमध्ये मालवा इंटरप्रायझेस नावानं बोगस कंपनी उभी केली. कंपनीद्वारे बँका-सरकारी संस्थांना खोटे स्टॅम्प पेपर विकले.
12 राज्यांत विक्री झालेल्या स्टॅम्प पेपर्सची किंमत 20 हजार कोटींहून जास्त होती. त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये तेलगी प्रकरणात शरद पवार आणि भुजबळ यांचंही नाव चर्चेत आलं. तेलगीला 2007 साली 13 वर्ष शिक्षा तर इतर 42 दोषींना 6 वर्ष कैद झाली. तेलगीचा 2017 मध्ये कर्नाटकात उपचार घेताना मृत्यू झाला. छगन भुजबळ रविवारी बीडमध्ये भाषण करताना म्हणाले की, तेलगी प्रकरणात पवारांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला. मात्र याआधी भुजबळ तेलगी प्रकरणावरुन तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारला टार्गेट करत होते.
दरम्यान, आपल्याला अजित पवारांनी विरोधी पक्षनेता केल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केला. शरद पवारांनी आम्हाला कधी जात-पात शिकवली नाही, मग आता मंचावर जातीचा विषय का निघाला? असं म्हणत धनंजय मुंडेंनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना घेरंलं. पण भाजप खासदार उदयनराजे भाजपात गेले तेव्हा आणि सांगलीत अमोल मिटकरींच्या विधानावेळी जातीवरुन कोण टिंगल करत होतं? असा प्रश्न आव्हाडांनी धनंजय मुंडेंना विचारलाय.
शेतकऱ्यांना मदत, कांद्याचा प्रश्न, ओबीसी आरक्षणामुळे गेली 2 वर्ष न झालेल्या महापालिका निवडणुका, यावरुन अजित पवार गटाचे नेते विरोधात असताना रान उठवत होते. मात्र ते सत्तेत गेल्यानंतर त्यावर का बोलत नाहीत, त्याचा पाठपुरावा का होत नाही? असे प्रश्न विरोधक करत आहेत.