पवारांच्या राष्ट्रवादीत खडसे कन्येला मोठं पद, राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली

| Updated on: Sep 13, 2023 | 12:47 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

पवारांच्या राष्ट्रवादीत खडसे कन्येला मोठं पद, राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली
Follow us on

जळगाव | 29 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं नाही. अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उचललेलं पाऊल ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. पण अजित पवार यांच्या या निर्णयामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. त्यानंतरही शरद पवार यांनी हार मानलेली नाही.

अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय. अशा परिस्थितीत शरद पवार हे पक्ष बांधणीसाठी कामाला लागले आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शरद पवार यांनी रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

शरद पवारांनी दिलं नियुक्ती पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्याकडून रोहिणी खडसे यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीचं पत्र देण्यात आलंय. त्यामुळे रोहिणी खडसे यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष या रुपाली चाकणकर होत्या. पण पक्षात फूट पडल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांना समर्थन देण्याचं ठरवलं. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून त्यांच्या गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.

रुपाली चाकणकर यांच्या आधी चित्रा वाघ महिला प्रदेशाध्यक्ष होत्या. पण त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  रुपाली चाकणकर यांच्याकडून चांगल्या पद्धतीने ही जबाबदारी पार पाडण्यात आली. त्यामुळे त्यांची महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी देखील वर्णी लागली होती. तेव्हापासून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षादेखील आहेत.

शरद पवार यांची आणखी एक राजकीय खेळी

शरद पवार यांनी आणखी एक राजकीय खेळी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे नेते बबन गित्ते यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. आता याच बबन गित्ते यांच्यावर शरद पवार यांच्याकडून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बबन गित्ते यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली आहे. शरद पवार यांच्याकडून बबन गित्ते यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं आहे. परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन गित्ते यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचे हे संकेत मानले जात आहे.