अनिल केऱ्हाळे, जळगाव : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर संताप व्यक्त केलाय. त्यांनी सध्याच्या राजकारण्यांवर खालच्या शब्दांत टीका केलीय. “आपण हरामखोर लोकांना निवडून देतो. त्याचे हे फळं आहेत. आपल्याला कळत नाही का कोण चांगलं आहे ते?”, असा घणाघात भालचंद्र नेमाडे यांनी केलाय. जळगावातील जैन हिल्स येथे जैन समूहाच्या वतीने साहित्यिकांसाठी साहित्य कला पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“चांगल्या लोकांनी राजकारणात पडूच नये हे असं झालंय. कुठला चांगलं माणूस धजेल यात? खोक्यांची भाषा चालते का? आपल्या सारख्याला शक्य नाही”, असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.
“आपल्याला उद्याची काळजी असते. काय खावं काही नाही, अर्ध्या लोकांना अन्न मिळत नाही. हे सांगतात पण 60 टक्के लोकं अपुरे राहतात. त्यांना समतोल अन्न मिळत नाही. नीट सगळ्या गोष्टी मिळणं हे आपल्याकडे होत नाही’, असा दावा त्यांनी केला.
“फार तर 10 ते 15 टक्के लोकांचं नीट चाललंय. अशा लोकांनी कुणाला निवडून द्यावं, हे तर कळलं पाहिजे. लोकशाहीचा काय उपयोग आहे ?”, असा प्रश्न नेमाडे यांनी उपस्थित केला.
“आपण कुणाला मत देतोय हे कळल्याशिवाय कसं सुधारणार आहे?”, असादेखील सवाल त्यांनी यावेळी केला.