मुंबई : “शरद पवार सोबत आल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देणार अशी भाजपाने अट ठेवली आहे” असा दावा विजय वेडड्टीवार यांनी आज केला. काँग्रेस आमदार असण्याबरोबरच ते राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सर्वत्र त्यांच्या विधानाची चर्चा आहे. भविष्यात काही बदल झाल्यास तुमच्याकडे प्लान बी तयार आहे का? असा प्रश्न टीव्ही 9 च्या पत्रकाराने त्यांना विचारला.
“आघाड्यांमध्ये इंडियाची बैठक 1 तारखेला होणार आहे. फार दिवस राहिलेले नाहीत. त्या बैठकीची तयारी सुरु आहे. शरद पवार या बैठकीचे सह यजमान आहेत. पवार साहेबांनी मार्गदर्शन केलय. आमच्या दोन-तीन बैठका झाल्या. त्यातून त्यांच्या भूमिकेबद्दल मला काही वाटलं नाही. आता हे भेटले म्हणून त्यांच्या भूमिकेत काही बदल होईल असं मला वाटत नाही. आता 1 तारखेला ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
प्लान ए,बी बद्दल वडेट्टीवार काय म्हणाले?
“प्लान बी म्हणण्यापेक्षा राजकीय, राष्ट्रीय पक्ष आहे. जो तो पक्ष आपली तयारी करत असतो. आघाडी झाली, तर प्लान ए नाहीतर बी आणि सी असं आहेच. निवडणुकीपासून कोणी दूर राहू शकत नाही. प्रत्येक पक्षाला आपली तयारी करावीच लागते. पवारसाहेब आघाडी विरुद्ध काही भूमिका घेणार नाहीत, हा मला विश्वास आहे” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
मतदार संघाच्या चाचपणीवर काय म्हणाले?
काँग्रेस मतदारसंघ निहाय चाचपणी करतेय, हा प्रश्न सुद्धा त्यांना विचारण्यात आला. त्यावर “शिवसेना, भाजपाने चाचपणी सुरु केलीय. शिंदे गटाने चाचपणी सुरु केलीय. आता अजित पवार गटाचे लोक चाचपणी करत आहेत. मतदारसंघात पोषक आणि अनुकूल वातावरण आहे का? हे जाणून घेण्यासाठी चाचपणी केली जाते. ज्या जागेवर लढायच आहे, तिथे पक्षाची स्थिती, कार्यकर्ते किती भक्कम आहेत, हे जाणून घेण्यासाठी चाचपणी केली जाते” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.