हिंगोली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिने आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यावरून दिवसभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही केतकीवर या प्रकरणी टीका केली होती. तर पुणे आणि ठाण्यात (thane) केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी केतकीला ताब्यातही घेतलं आहे. मात्र, याबाबत शरद पवार यांना विचारलं असता आपण संबंधित व्यक्तिला ओळखत नाही आणि नेमकं काय झालं ते प्रकरणही आपल्याला माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच पवारांनी या प्रकरणावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे. हिंगोलीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनाही कानपिचक्या दिल्या.
नेमकं काय प्रकरण आहे. हे मला ठाऊक नाही. व्यक्तीही माहीत नाही. तुम्ही सांगता तेही माहीत नाही. त्यांनी काय केलं. तक्रार काय होती. एक्झॅटली काय केलं ते कळल्याशिवाय बोलता येत नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. दोन-तीन दिवस माझ्याबद्दलची एक तक्रार वाचण्यात आली. एका कवीच्या काव्याचा मी भाषणात उल्लेख केला होता. त्यावर काही लोकांनी वेगळं मत मांडलं. पण ते वास्तव नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी अकबरुद्दीन ओवैसी यांना फटकारले. ज्यांना महाराष्ट्र आणि देशाचा इतिहास माहीत आहे. औऱंगजेबाने त्यांच्या कालखंडात काय केलं माहीत असताना कुणी तरी बाहेरून येऊन राज्य अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे. ते योग्य वाटत नाही. त्यामुळे त्याचा निषेध केला पाहिजे, असं पवार म्हणाले.
6 जून रोजी ठाकरे सरकार जाणार असल्याचं विधान केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही एकत्रं सरकार चालवत आहोत. काही अडचणच नाहीये. आमचं व्यवस्थित चाललं आहे. सामंजस्याने चाललं आहे. आणखी पाच वर्ष आम्हाला सत्ता मिळायला हरकत नाही. हे पाच वर्ष राहीलच आणि पाच वर्ष मिळतील, असंही ते म्हणाले. तसेच, राणे साहेब, चंद्रकांत पाटील साहेब हे सारखे तारखा देत असतात. आम्ही ऐकत असतो. एन्जॉय करत असतो आणि ते सोडून देत असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
शेतकरी आत्महत्येचं वाचनात आलं. याप्रकरणाच्या खोलात गेलो नाही. यंदाच्या वर्षी जालना जिल्ह्यात आणि बीडच्या काही भागात आणि सातारमध्ये अतिरिक्त ऊस आहे. राज्य सरकार ज्या पद्धतीने साखर कारखान्यांना सूचना देत आहे. कारखाने बंद करू नका असं सरकारकडून सांगणं सुरू आहे. ते काम सरकारकडून सुरू आहे, असंही ते म्हणाले.